गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पाच आमदार निवडून आले होते. त्यांच्यापैकी तीन आमदार आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच तीन अपक्ष आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे भाजप आम आदमी पक्षाला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. येत्या एक आठवडय़ात यासंबंधीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
धर्मेंद्रसिंह वाघेला (वाघोडिया मतदारसंघ), धवलशीष झाला (बायद मतदारसंघ) आणि मावाजीभाई देसाई (धनेरा मतदारसंघ) या तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे संकेत निवडणुकीचे परिणाम समोर येण्याआधीच दिले होते. आम्ही निवडून आलो तर भाजपला पाठिंबा देऊ. कारण आम्ही मूळचे भाजपचेच आहोत. आम्हाला तिकीट नाकारण्यात आले, म्हणून आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे, असे त्यांनी गेल्या बुधवारीच स्पष्ट केले होते.
आप आमदारही भाजपमध्ये ?
आम आदमी पक्षाच्या पाच आमदारांपैकी तीन आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या पक्षाचा आणखी एक आमदार भाजपमध्ये येण्यास तयार झाल्यास पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर न येता हे पक्षांतर होऊ शकते. त्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहिली जाणार आहे, अशीही चर्चा आहे. भूपत भायानी या आमदाराने रविवारीच आपला कल भाजपकडे असल्याचे स्पष्ट केले होते. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मला सरकारशी जुळवून घेतले पाहिजे. राज्यात भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमतासह जनादेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे माझा कल भाजपकडे आहे. मात्र, मी मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांना विचारुन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
आणखी दोन आमदार येणार ? भायानी यांच्याशिवाय उमेश मकवाना (बोटद मतदारसंघ) आणि सुधीर वाघाणी (गरियाधर मतदारसंघ) यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. आम आदमी पक्षाच्या या दोन्ही आमदारांनी या वृत्ताचा इन्कार केला असला तरी नेमके काय होईल हे सांगता येत नाही अशी स्थिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही भाजप नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या चार आमदारांशी संपर्क केला असल्याचेही वृत्त आहे. परिणामी, येते काही दिवस गुजरातच्या राजकारणात अतिशय खळबळजनक ठरतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.