वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 12 संघात विंडीज संघाला प्रवेश मिळाला नाही. सुपर 12 फेरीसाठी झालेल्या प्राथमिक फेरीतच विंडीजचे आव्हान संपुष्टात आले. विंडीज संघाच्या या खराब कामगिरीमुळे प्रमुख प्रशिक्षक फिल सिमॉन्स वर्षअखेरीस आपल्या पदाचा त्याग करणार आहेत.
क्रिकेटच्या टी-20 प्रकारामध्ये विंडीजचा संघ अव्वल समजला जात होता. त्यांनी 2012 आणि 2016 साली असे दोनवेळा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे विंडीज संघाला या प्रकारातील अव्वल संघ म्हणून ओळखला जात होता. पण ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यांना सुपर 12 संघात प्रवेश मिळविता आला नाही. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेमध्ये त्यांना स्कॉटलंड आणि आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला. राऊंड रॉबिन लिगमध्ये विंडीजने केवळ झिंबाब्वेचा पराभव केला होता. चार संघाच्या गटामध्ये या कामगिरीमुळे विंडीजला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. या निकृष्ठ कामगिरीने विंडीजला 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
विंडीज संघाला माजी कसोटीवीर फिल सिमॉन्स यांचे मार्गदर्शन लाभले होते. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेवेळी सिमॉन्सची विंडीज संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान होणाऱया ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपर्यंत सिमॉन्स आपल्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील अशी माहिती क्रिकेट विंडीजच्या प्रवक्त्याने दिली. चालू वर्षाच्या प्रारंभी सिमॉन्सच्या मार्गदर्शनाखाली विंडीज संघाने इंग्लंड विरुद्धची अटीतटीची कसोटी मालिका 1-0 अशा फरकारने जिंकून रिचर्डस्-बोथम चषकावर आपले नाव कोरले होते. तसेच विंडीजने बांगलादेशबरोबरची कसोटी मालिका सिमॉन्स यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकली होती.