वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
यजमान ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजचा एकतर्फी 2-0 असा पराभव केला. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 31 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळविला.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 178 धावा जमवित विंडीजला 179 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 8 बाद 147 धावा जमविल्याने त्यांना हा सामना आणि मालिकाही गमवावी लागली.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 41 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 75 धावा झळकवल्या. कर्णधार फिंचने 1 चौकारासह 15, स्टीव्ह स्मिथने 2 चौकारांसह 17, टीम डेव्हिडने 20 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 42, वेडने 14 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 6 षटकार आणि 19 चौकार नेंदविले गेले. वॉर्नर आणि फिंच या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 85 धावांची भागीदारी केली. विंडीजतर्फे जोसेफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 21 धावात 3 तर मॅकॉयने 33 धावात 2 आणि ओडेन स्मिथने 24 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. सलामीच्या चार्ल्सने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29, मेयर्सने 1 षटकारासह 6, किंगने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23, कर्णधार पूरनने 2, होल्डरने 13 चेंडूत 1 चौकारासह 16, पॉवेलने 17 चेंडूत 1 षटकारासह 18, अकिल हुसेनने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25, ओडेन स्मिथने 4, जोसेफने 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 20 धावात 4 तर कमिन्सने 32 धावात 2 आणि ग्रीन तसेच झम्पाने प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावात चार्ल्स आणि किंग यांनी दुसऱया गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकात 7 बाद 178 (वॉर्नर 75, डेव्हिड 42, स्मिथ 17, वेड 16, फिंच 15, जोसेफ 3-21, मॅकॉय 2-33, स्मिथ 1-24), विंडीज 20 षटकात 8 बाद 147 (चार्ल्स 29, किंग 23, पॉवेल 18, होल्डर 16, अकिल हुसेन 25, जोसेफ नाबाद 11, स्टार्क 4-20, कमिन्स 2-32, ग्रीन 1-35, झम्पा 1-34).