वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजची अनुभवी अष्टपैलू महिला क्रिकेटपटू दियांद्रा डॉटिनने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. डॉटिनने आपल्या चौदा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये दर्जेदार कामगिरी करत विंडीज महिला संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. डॉटिनने 260 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने विंडीज संघाकडून 143 वनडे सामन्यात 3 शतकांसह 30.54 धावांच्या सरासरीने 3727 धावा जमविल्या आहेत तर टी-20 प्रकारात तिने 124 सामन्यात 2 शतकांसह 26.28 धावांच्या सरासरीने 2681 धावा जमविल्या आहेत. डॉटिनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत क्रिकेटच्या विविध प्रकारात 133 गडी बाद केले आहेत. विंडीजतर्फे महिलांच्या वनडे मध्ये डॉटिन सर्वाधिक धावा जमविणारी दुसरी क्रिकेटपटू आहे. तर टी-20 प्रकारात तिने सर्वाधिक बळी मिळविणाऱया विंडीजच्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळविले आहे. बर्मिंगहममध्ये सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डॉटिन बार्बाडोस संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. डॉटिनची ही शेवटची स्पर्धा आहे. महिलांच्या टी-20 प्रकारात बुधवारी भारत आणि विंडीज यांच्यात सामना होणार आहे.