वृत्तसंस्था/ बुलावायो
यजमान झिंबाब्वे आणि विंडीज यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाअखेर अनिर्णित राहिली. या सामन्यात द्विशतक झळकवणारा विंडीजचा सलामीचा फलंदाज तेगानरेन चंद्रपॉलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने आपला पहिला डावा 6 बाद 447 धावावर घोषित केला होता. टी. चंद्रपॉलने नाबाद 207 तर कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 182 धावा जमवताना सलामीच्या गडय़ासाठी 336 धावांची भागीदारी केली होती. विंडीजच्या पहिल्या डावात झिंबाब्वेच्या मेयुताने 140 धावात 5 गडी बाद केले. त्यानंतर झिंबाब्वेने आपला पहिला डावा 9 बाद 379 धावावर घोषित केला. बॅलेन्सने शानदार नाबाद शतक (137) तर केया आणि मेयुता यांनी अर्धशतके झळकविली. विंडीजतर्फे जोसेफने 3 तर मोती आणि होल्डर यांनी प्रत्येकी दोन गडी तसेच रॉच आणि बेथवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजने आपला दुसरा डाव 5 बाद 203 धावावर घोषित करून झिंबाब्वेला निर्णायक विजयासाठी 272 धावांचे आव्हान दिले. विंडीजच्या दुसऱया डावात रिफेर आणि ब्लॅकवुड यांनी अर्धशतके झळकविली. झिंबाब्वेच्या मासाकेझाने 3 तर इव्हान्स दोन गडी बाद केले. झिंबाब्वेने खेळाच्या शेवटच्या दिवशी दुसऱया डावात 54 षटकात 6 बाद 134 धावा जमवत हा सामना अनिर्णित राखला. केया 24 तर छिबाबाने 31 धावा जमवल्या. विंडीजच्या मोतीने 4 तर चेसने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव 6 बाद 447 डाव घोषित, झिंबाब्वे प. डाव 9 बाद 379 डाव घोषित, विंडीज दु. डाव 60 षटकात 5 बाद 203 डाव घोषित, झिंबाब्वे दु. डाव 54 षटकात 6 बाद 134.