शरद पवार, बाळासाहेब लांडगे यांच्या सत्तेला आव्हान
आज उमेदवारी भरण्याचा अंतिम दिवस, रविवारी अर्ज माघार तर 31 जुलैला मतदान
कोल्हापूर /संग्राम काटकर
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतही सत्तांतराचे वारे वाहू लागले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केल्यानंतर नियुक्त केलेल्या ऍड हॉक समितीने परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करताना कार्यक्रमही जाहीर केला. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे यांच्या परिषदेवरील दीर्घकालीन सत्तेला वर्धा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार रामदास तडस आणि अर्जुनवीर पै. काका पवार यांच्या गटाने थेट आव्हान दिले आहे.
राज्यातील 45 जिल्हा तालीम संघांपैकी 33 तालीम संघांचा तडस, पवार गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. या पाठिंब्याच्या जोरावर निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. रविवारी 24 रोजी म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यातील कुस्ती क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची भारतीय कुस्ती महासंघाने मान्यता काढून घेतल्यानंतर ती पुन्हा मिळवून आपलीच सत्ता कायम ठेवण्यासाठी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी हालचाली केल्या होत्या. पण त्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र आहे. पंधराच दिवसापूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे अनियमित व्यवहार, महासंघाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, 15 व 25 वर्षाखालील मल्लांच्या कुस्ती आयोजनास टाळाटाळ असे ठपके ठेवत राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता काढून घेतली. शिवाय ऍड हॉक समिती नेमली. महासंघाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे महाराष्ट्रातील कुस्तीक्षेत्रच हादरुन गेले. यातून परिषदेवर असणारी शरद पवार यांच्या हुकूमतीचे काय होणार? या विषयी चर्चा सुरू झाली. पवार यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचे दिल्लीच्या पातळीवर प्रचंड प्रयत्न केले. पण त्यांना फारसे यश मिळाले नसल्याचे सध्यातरी दिसते.
दरम्यानच्या काळात भारतीय कुस्ती महासंघाने नियुक्त केलेल्या ऍड हॉक समितीने राज्य परिषदेवर नवी कार्यकारिणी नेमण्याचे पाऊल उचलले. या समितीने गेल्या 11 जुलैला परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. नागपुरात होणाऱया निवडणूकीचा कार्यक्रम निवृत्त न्यायाधिश यांच्यासह तीन जणांच्या समितीकडून राबवला जात आहे. त्यामुळे सहाजिकच समितीवरील पवार यांची पकड निसटून ती अन्य कोणाकडे जाणार काय? याची चर्चा सुरू झाली आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस
गेल्या पाच-सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील परिषदेशी सलग्न 45 कुस्ती संघटनांमधील निवडक पदाधिकाऱयांनी निवडणूक रिंगणात उतरुन आपली उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे सांगण्यात आले. आज शुक्रवार 22 जुलै रोजी दुपारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. रविवार 24 जुलै रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. रविवार 31 जुलै रोजी मतदान व निकाल आहे.
तडस, पवार गटाच्या बिनविरोधसाठी हालचाली
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खासदार रामदास तडस आणि अर्जुनवीर पै. काका पवार यांच्या गटाने परिषदेच्या सत्तेवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा संघटनांच्या पदाधिकाऱयांना आपल्या गटाकडे खेचण्याचेही त्यांचे प्रयत्न आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 45 जिल्हा संघटनांपैकी केवळ 12 संघटनांचा अपवाद वगळता इतर सर्व 33 जिल्हा संघटना तडस, पवार गटांना येऊन मिळाल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध करून सत्ता मिळविण्यासाठी तडस, पवार गटाचा मनसुबा आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेवर सत्ता कोणाचीही ? हे आता रविवार 24 रोजी म्हणजेच माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेची अशी असेल नवी कार्यकारिणी
अध्यक्ष-1, वरिष्ठ कार्याध्यक्ष-1, उपाध्यक्ष-6, सरचिटणीस-1, खजिनदार-1, विभागीय सचिव-6, कार्यकारिणी सदस्य-8
उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ?
उपमहाराष्ट्र केसरी व आशियाई सुवर्ण पदक विजेते रविंद्र पाटील (रा. बानगे, ता. करवीर) हे तडस, पवार यांच्या गोटातून कुस्तीगीर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणूक बिनविरोध झाल्यास त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.