वृत्तसंस्था /माद्रीद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदालने शानदार विजयाने आपले पुनरागमन केले तर आजारपणामुळे ब्रिटनच्या मरेने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या एकेरीच्या सामन्यात नदालने सर्बियाच्या केमॅनोव्हिकचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. गेल्या मार्चपासून नदाल दुखापतीमुळे टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होता. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर त्याने बरगडय़ाना झालेल्या दुखापतीमुळे विश्रांती घेतली होती. एटीपी टूरवरील 2022 च्या टेनिस हंगामात 22 वर्षीय केमॅनोव्हिकने सर्वाधिक विजय नोंदविणाऱया टेनिसपटूंमध्ये दुसरे स्थान घेतले आहे. त्याने 23 सामने जिंकले आहेत. रशियाचा रूबलेव्ह 24 सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले आहे. नदालने ही स्पर्धा यापूर्वी तीनवेळा जिंकली आहे. बेल्जियमचा गोफीन आणि हॉलंडचा झेंडस्कल्प यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर नदालचा पुढील फेरीतील सामना होणार आहे. नदाल या विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या द्वितीय मानांकित व्हेरेव्हने क्रोएशियाच्या सिलीकवर 4-6, 6-4, 6-4 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. व्हेरेव्हने ही स्पर्धा यापूर्वी दोनवेळा जिंकली आहे.
ब्रिटनच्या अँडी मरेने प्रकृती नादुरूस्तीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मरेचा पुढील सामना सर्बियाच्या जेकोव्हिचबरोबर खेळविला जाणार होता. एटीपी टूरवरील माद्रीद खुल्या 1000 दर्जाच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत नदाल आणि जोकोव्हिच यांच्यातील सामना पाहण्यासाठी टेनिस शौकिन उत्सुक झाले होते. मरेने स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांची निराशा झाली. मरेला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. मरेने या स्पर्धेतून पहिल्या दोन सामन्यामध्ये थिएम आणि शेपोव्हॅलोव्ह यांचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला होता.