Tarun Bharat

कृष्णधवल ते रंगीत चित्रपटाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड : तब्बल 50 वर्षे सिनेसृष्टीत योगदान

प्रतिनिधी,कोल्हापूर
गेली पाच दशके मराठी चित्रपटसृष्टीची सेवा करत अमूल्य असे योगदान देणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र मार्तंड कुलकर्णी (वय 88, रा. प्लॉट नंबर 16 , शब्दश्री बंगला, शिवप्रभूनगर, कळंबा, कोल्हापूर) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस प्रकृती अस्वथ्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ, जाणता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

कुलकर्णी यांच्या पार्थिवार पंचगंगा स्मशानभूमीत दुपारी दोनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत ज्येष्ठ दिग्दर्शक भास्करराव जाधव, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, रणजीत जाधव, दादांचा वारसदार फेम नितीन कुलकर्णी, बादशाही लॉजचे मालक शशिकांत जोशी, अभिनेते, निर्मातेसंजय तोडकर, विश्वराज जोशी, अरुण चोपदार, पंडीत कंदले, मंगेश मंगेशकर, रविंद्र गोरगावकर, बबन कांबळे, केदार आमले, डॉ. कविता गगराणी, प्रायव्हेट हायस्कूलचे संचालक प्रशांत कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. रक्षाविसर्जन आज रविवारी सकाळी 8.30 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे. कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुहास आणि शंतनू, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुलकर्णी यांनी श्रध्दांजली वाहण्यासाठी सोमवार 20 मार्च रोजी दुपारी 4 वाजता प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.

मराठी चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाईट ते कलर अशा बदलत्या प्रवासाचा अनुभव घेत अभिनयात योगदान देणाऱ्या भालचंद्र कुलकर्णी यांनी तिनशेहून अधिक मराठी चित्रपटात अभिनय केला. गावचा पाटील ते नेता आणि शिक्षक ते मुलीचा बाप अशा असंख्य भूमिका साकारल्या. 1966 मध्ये त्यांनी राजा गोसावींची प्रमुख भूमिका असलेल्या दत्ता माने दिग्दर्शीत ‘शेरास सव्वाशेर’ चित्रपटातून सुरूवात केली. अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्या वडिलांची त्यांनी ‘धुमधडाका’ चित्रपटात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. ‘माहेरची साडी’ या सुपर डुपर चित्रपटात अलका कुबल यांच्या वडिलांच्या भूमिकेने तर कुलकर्णी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचले होते. ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. ‘जोतिबाचा नवस’ चित्रपटामध्ये त्यांनी सासनकाठी नाचवली होती. तुफान गाजलेल्या पिंजरा चित्रपटातील त्यांचा पोलीस इन्स्पेक्टरही लक्षवेधी ठरला होता. सेंगाड्या, मर्दानी, मासूम, झुंज तुझी माझी, हळद रूसली कुंकू हसलं, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, नवरा नको गं बाई, जावयाची जात, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक आदी चित्रपटातील कुलकर्णी यांच्या भूमिकाही प्रभावी ठरल्या होत्या.

शिक्षक, लेखक, साहित्यिक, अभिनेता सर्वव्यापी व्यक्तीमत्व
भालचंद्र कुलकर्णी यांचे मुळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगले तालुक्यातील आळते. त्यांनी कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये मराठीचे शिक्षक म्हणून योगदान दिले. हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या कुलकर्णी यांनी आपली अभियन क्षेत्रातील आवड जपत त्यात उंची गाठली. मराठीवर प्रभुत्व असणाऱ्या कुलकर्णी यांना बहारदार आवाजाची देणगी लाभली होती. त्याचा त्यांनी अभियनात खुबीने वापर केला. ते लेखक होते. वादळवेल, तुम्हावर केली मर्जी बहाल ही दोन नाटकेही त्यांनी लिहिली. पुस्तकांचे लेखन करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तीमत्वाबरोबर इतर बाबीही अक्षररूपात रसिकांपुढे आणल्या. हाडाचे शिक्षक असणाऱ्या कुलकर्णी यांनी शाळेप्रमाणे चित्रपटसृष्टीतही नवीन पिढी घडविणाऱ्या शिक्षकाची भूमिका निष्ठेने पार पाडली. ऐशीच्या दशकात गाजलेल्या बाल शिवाजी या चित्रपटातील म्हमद्याची भूमिका साकलेले अभिनेते संजय तोडकर, दादा कोंडके यांचे वारसदार म्हणून अखंड महाराष्ट्राला ओळख असणारे हास्य अभिनेते नितीन कुलकर्णी, आवाजाची देणगी लाभलेले विश्वराज जोशी यांच्यासारख्या ऐशी, नव्वदच्या दशकात करिअर सुरू केलेल्या असंख्य अभिनेत्यांना कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कुलकर्णी यांना अभिनयातील योगदानाबद्दल अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रभूषण पुरस्काराने गौरविले होते. तसेच राज्यशासनासह इतर असंख्य संस्थांकडूनही त्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

अ. भा. चित्रपट महामंडळाशीही नाते
भालचंद्र कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सचिव, संचालक म्हणून दीर्घकाळ जबाबदारी पार पाडली. मराठी चित्रपटातील कलाकारांना पेन्शन मिळावी, यासाठी त्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिली. कलाकारांच्या प्रश्नावर काहीवेळा आक्रमक भूमिका घेतली.

मराठीसह हिंदी, कन्नड चित्रपटात अभिनय
कुलकर्णी यांनी संगोळी राय्यण्णा यांच्यावरील कन्नड चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी ओमपुरी यांच्याबरोबर एक हिंदी चित्रपटही केला होता.

गणेशोत्सवातील कलाकारांचा आवाज
कोल्हापुरात गणेशोत्सवात सजीव देखावे साकारण्याची परंपरा आहे. गेल्या तीस चाळीस वर्षांत गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते जे सजीव देखावे सादर करत आले, त्या सर्व देखाव्यातील अनेक महत्वाच्या भूमिका असणाऱ्या पात्रांचे आवाज भालचंद्र कुलकर्णी बनले होते. देखाव्याच्या डबिंगपासून सहभागी कार्यकर्तारूपी कलाकारांना मार्गदर्शन करण्याचे कार्यही कुलकर्णी यांनी केले. त्यातून अनेक कलाकार तयार झाले.

पुस्तक, नाटक लेखन, एकपात्री प्रयोग
मराठी चित्रपटसृष्टीचे किमयागार, चित्रपुरीचे मानकरी, विखुरलेले मोती ही पुस्तके आणि वादळवेल, तुम्हावर केली मर्जी बहाल ही दोन नाटकेही त्यांनी लिहिली. त्यातील तुम्हावर केली… हे नाटक ग्रामीण महाराष्ट्रात त्या काळी प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तसेच त्dयांनी एकपात्री प्रयोगही त्यांनी केले होते.

चहाची जाहिरात आणि कुलकर्णींचा रूबाब
सुवासिनींनी कुकवाला…अन् मर्दानी चहाला नाही म्हणून नये….ऽऽऽऽ असा डायलॉग असणाऱ्या कुलकर्णी यांच्या मर्दानी आवाजातील एका चहाच्या कंपनीची जाहिरात नव्वदच्या दशकानंतर दूरचित्रवाहिनीवर गाजली होती. आजही त्याच्या जाहिरातीची आठवण निघते.

‘तरुण भारत संवाद’शी जिव्हाळा
भालचंद्र कुलकर्णी यांचे तरुण भारत संवादशी जिव्हाळ्याचे संबंध होते. तरूण भारतच्या वर्धापनदिनी दरवर्षी ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत असत. तरूण भारतचे समुह संपादक, सल्लागार किरण ठाकुर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के रूग्ण लस न घेतलेले

Archana Banage

कलिंगडला भाव 60 ते 70 रुपये.. व्यापाऱ्यांकडून मागणी मात्र पंधरा वीस रुपयाला

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची फेरनिवड

Archana Banage

कोल्हापूर : गांजा विक्री करणारी टोळी गजाआड

Archana Banage

वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Kalyani Amanagi

…म्हणून पुन्हा एकदा 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम-राजू शेट्टी

Archana Banage