बेळगाव : आंबेडकर गल्ली, मजगाव येथील रहिवासी मनीषा नागराज गिड्डूगोळ (वय 31) हिने दि. 5 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याचे सायंकाळी पाचच्या दरम्यान उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
सदर महिलेचा पती टॅक्सी ड्रायव्हर अूसून दुपारी 1.30 च्या सुमारास गोव्याला गेले होते. पत्नी मनीषा ही उद्यमबाग येथील वेगा हेल्मेट कंपनीत कामाला होती. गुरुवारी दुपारी तब्येत बरी नसल्याने रजा घेऊन घरी आली होती, असे पतीने सांगितले. पतीने विश्रांतीचा सल्ला देऊन टॅक्सी भाडे घेऊन गोव्याला गेले होते. सदर महिलेला एक मुलगा, दोन मुली आहेत. मुलांना बाहेर खेळायला सांगून मनीषाने आत्महत्या केल्याचे समजते. रात्री 10 पर्यंत मृतदेह लटकतच होता. या महिलेचे माहेर बानगे, कोल्हापूर असल्याचे समजते.
उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.