प्रतिनिधी /वास्को
वास्को चिखलीतील सांत जासिंतो बेटाजवळ कार व दुचाकीमध्ये झालेल्या भिषण अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर तीचा पुतण्या या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. मयत महिलेचे नाव रिना फर्नांडिस(40) असे आहे तर जखमीचे नाव वॅलीन फर्नांडिस(17) असे असून ती दोघे चिखली गावातील राहणारी आहेत.
वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील सांत जासिंतो बेटाजवळील सेंट अँथनी चॅपेलसमोर काल शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिखली गावातील राहिवासी असलेल्या रिना फर्नांडिस या आपल्या दुचाकीरून उच्च माध्यमीक विद्यालयात शिकणाऱया पुतण्याला घरी आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घरी परत येताना एका कारने चुकीच्या बाजुने येऊन त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन त्यांना काही मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भिषण अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. तर तीचा पुतण्या गंभीर जखमी झाला. जखमीला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. अपघातग्रस्त कार चालकाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या खुर्सालाही धडक दिली. त्यामुळे कारचीचीही हानी झाली.
या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये दोन अल्पवयीन मुलगे आणि दोन अल्पवयीन मुली होत्या. मौजमजा करण्यासाठी कोणाची तरी कार घेऊन ही चौकडी वास्कोला आली होती. त्यांच्यापैकी एकटा वास्कोतील राहणारा आहे. तर मुली व दुसरा युवक उत्तर गोव्यातील आहे. त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून आल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिली. त्यामुळे दारूच्या नशेत त्यांनी हा अपघात घडवला नसावा ना असा संशय पसरलेला आहे. अगदी विरूध्द दिशेने आणि चुकीची बाजू पकडून त्या कारने दुचाकीला धडक दिल्याने या अपघाताबाबत घटनास्थळी आश्चर्य पसरले होते. वास्को पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.