बारा तोळे सोने लंपास; अशोक चौकातील घटना
प्रतिनिधी/ कराड
तुम्ही देवाचे भक्त आहात, देव तुम्हाला आशीर्वाद देईल, अशी बतावणी करून कराडच्या अशोक चौकात एका घरात भामटय़ांनी प्रवेश केला. दोघा भामटय़ांनी महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील तब्बल साडेसहा लाखांचे 12 तोळ्याचे सोन्याचे दागिने हातचलाखीने गायब केले. दागिने गायब करून भरदिवसा हे भामटे पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या सुभद्रा रोकडे (रा. अशोक चौक, कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कराड पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेत नाकाबंदी करून वर्णनावरून संशयितांचा शोध सुरू केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभद्रा रोकडे या धार्मिक आहेत. त्या नेहमी भक्तीभावाने घरी महाप्रसाद करत असतात. दरम्यान शुक्रवारी दुपारी एक भामटा त्यांच्या घराजवळ आला. सुभद्रा रोकडे घरात एकटय़ाच होत्या. भामटय़ाने त्यांना तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल, अशी बतावणी करत तुमच्या घरात देव आहेत. त्याचे दर्शन घेऊन चांगले काही तरी घडेल, अशी बतावणी करत तो घरात आत गेला. रोकडे यांच्या भोळेपणाचा फायदा घेतला. घरातील देवघरात गेल्यावर तो देवाचे दर्शन घेतले. तेथे एक हजार रूपये ठेवले. त्यावेळी माझा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे, असे म्हणत तुमचे दागिने द्या, ते माझ्या दागिन्यांना लावतो. हे केल्याने माझ्याही धंद्यात बरकत येईल, असे म्हणत त्याने त्या महिलेचे दागिने रूमालात बांधून तेथेच जवळ ठेवले. त्याचवेळी त्यांच्या घराची कडी वाजली. कोण आले आहे, हे बघण्यासाठी त्या बाहेर गेल्या. त्यावेळी दारावरील माणसाने मी एका कंपनीकडून आलो आहे, तुमचे आधारकार्ड दाखवा. शासनाची मोहीम आहे, असे म्हणत सुभद्रा यांच्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यांनी जरा थांबण्यास सांगून त्या व्यक्तीकडे गेल्या. त्या व्यक्तीने तोपर्यंत हातचलाखीने त्यांच्या रूमाल बदलाल. दागिन्यांचा रूमाल घेऊन तो पसार झाला. त्यांच्या देवघरात दुसराच रूमाल ठेवला होता. आधारकार्ड दाखवलेली व्यक्तीही निघून गेली.
सुभद्रा यांनी रूमाल पाहिला. त्यावेळी त्यात 70 रूपये होते. दागिने गायब लंपास झाले होते. त्यांच्या नातेवाईकांच्याही गी गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्वरीत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही तातडीने भामटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही यश आले नाही. त्या भागातच पालिकेसह व्यापाऱयांनी बसवलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, साहायक पोलीस निरिक्षक अमित बाबर तपास करत आहेत