प्रतिनिधी/ सातारा
स्टेट बँकेतील कर्मचारी आहे असे भासवून गुंतवणुकीवर 25 टक्के व्याज मिळवून देते, असे अमिष दाखवून 9 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करणाऱया महिलेविरुद्ध महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उज्वला संपत माने (रा. देगाव ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार आशा पोपट जाधव (वय 57, रा. गणेशनगर बोपखेल पुणे) या 2017 साली सातारा येथील अंजठा चौक मोरे कॉलनीत राहत होत्या. त्यावेळी उज्वला माने ही घरी आली. तिने मी स्टेट बँकेत कार्यरत असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर 25 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. आणि 2019 पर्यंत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने व रोख स्वरुपात 9 लाख 10 हजार रुपये घेतले. हे पैसे घेऊन ठरल्याप्रमाणे व्याज दिले नाही. यामुळे आशा जाधव यांनी पैसे परत मागितले. तरी ते दिले नाहीत. यामुळे आशा जाधव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे करत आहेत.