पालकर बिल्डींगमधील महिला गेल्या पालिकेत; गारवा बिर्याणीला कनेक्शन दिल्याने विचारला जाब
प्रतिनिधी/ सातारा
माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांच्या नेतृत्वाखाली रविवार पेठेतील पालकर बिल्डींगमधील महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांना घेराव घालून गारवा बिर्याणीला कसे 1 इंची नळ कनेक्शन दिले असा जाब विचारला. त्यावर अभियंता वाठारे यांनी रितसर नियमानुसार कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही चूक नाही, असे निक्षून सांगितले.
सोमवारी सकाळी 11.30 वाजता सातारा पालिकेत पालकर बिल्डींग येथील महिला पाणी पुरवठा विभागात गेल्या. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके या होत्या. त्यांनी अभियंता वाठारे यांना निवेदन देत पालिकेच्या हद्दीत गिते वखार चौक ते सावंत चौक या परिसरात मुळ पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत आहे. दर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. ट्रॅकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागते. असे असताना याच पाईपलाईनमधून मल्हार पेठेतील पालकर बिल्डींगमधील हॉटेल गारवा बिर्याणीला 1 इंची नळ कनेशक्शन दिले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
तसेच पालिका परवानगी अनिश्चित रात्री 1.30 च्या सुमारास बोअर माऊन पाईप लाईनमधून अतिरिक्त बेकायदेशीर कनेक्शन सुद्धा या गाळा धारकांनी घेतले आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर अभियंता शहाजी वाठारे यांनी त्यांना कनेक्शन नियमानुसार दिले आहे. रात्रीचे नळकनेकशन दिले कारण वाहतूकीला अडथळा होवू नये म्हणून रात्रीचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.