आत्महत्या करणारा सांगली शहर पोलीस ठाण्याचा सफाई कर्मचारी
सांगली प्रतिनिधी
महिला खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सांगली शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अतुल विकास गर्जे-पाटील (वय 36, रा. बदाम चौक) याने सांगली शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेसवर विष पिऊन आत्महत्या केली. अतुल याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. सावकार महिला सुवर्णा पाटील हिच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल गर्जे-पाटील हा शहर पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षापासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. अतुल हा जुनी पोलिस लाईनजवळील बदाम चौकात राहत होता. मंगळवारी कामावर आल्यापासून चिंताग्रस्त होता. सकाळी साडे अकरापर्यंत पोलिस ठाण्यातील सफाईचे काम आटोपले. त्यानंतर तो कोणालाही आढळून आला नाही. दरम्यान महापालिकेचे चार ते पाच कर्मचारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आले. पोलिस ठाण्यावरून गेलेल्या केबलची दुरूस्ती करायची असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे अंमलदारांनी खात्री करून त्यांना टेरेसवर पाठवले. कर्मचारी टेरेसवर गेले तेव्हा एका कोपऱ्यात अतुल तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत निपचिप पडलेला दिसला. त्यामुळे कर्मचारी घाबरून खाली आले. त्यांनी ठाणे अंमलदारांना हा प्रकार सांगितला. त्यांनी कर्मचाऱ्यांसह वरती जाऊन पाहणी केली. तेव्हा अतुलच्या बाजूला विषाची बाटली पडलेली दिसली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अतुलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात त्याने सावकार महिला सुवर्णा पाटीलच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेला आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. अतुलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये येऊन माहिती घेतली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक समीर ढेरे, उपस्थित होते. महिला सावकार पाटील हिच्याविरूद्ध रात्री उशिरानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा पाटील गेल्या काही दिवसपासून अटक
शामरावनगर येथील महिला सावकार सुवर्णा माणिक पाटील हिच्यावर काही दिवसापुर्वी सावकार सेलने गुन्हा दाखल केला होता. ती अटकेत असताना तिच्याविरोधात आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतरही तिची सावकारी सुरू होती. काही दिवसापूर्वी ती जामिनावर मुक्त झाली होती. त्यानंतर तिच्या वसुलीच्या तगाद्यामुळे अतुलने आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.