15,600 फुटांच्या उंचीवरील क्षेत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फायर अँड फ्यूरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमीत तैनात होणाऱया पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कॅप्टन शिवा चौहान यांनी अवघड प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीत तैनात करण्यात आल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले.
कॅप्टन शिवा चौहान यांना कुमार पोस्टमध्ये ऑपरेशन स्वरुपात तैनात करण्यात आल्याचे फायर अँड फ्यूरी कॉर्प्सकडून सांगण्यात आले. कुमार पोस्टमध्ये तैनात करण्यापूर्वी शिवा चौहान यांना अवघड प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले होते. सियाचिन ग्लेशियन हे पृथ्वीवरील सर्वात उंचीवरील युद्धभूमी आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये सियाचीन ग्लेशियरवर 15,632 फुटांच्या उंचीवरील कुमार पोस्टवर 8 दिव्यांगांची एक टीम पोहोचली होती. त्यांनी कुमार पोस्टवर पोहोचून विश्वविक्रम केला होता.
सियाचिन ग्लेशियरमधील कुमार पोस्ट 15,632 फूटांच्या उंचीवर आहे. फायर अँड फ्यूरी कॉर्प्सकडून दोन छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये कॅप्टन शिवा यांना पाहिले जाऊ शकते. ही छायाचित्रे आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका छायाचित्रात ‘वेलकम टू कुमार पोस्ट’ असा फलक दिसून येतो.