Tarun Bharat

महिला आशिया चषक स्पर्धा आजपासून

Advertisements

भारत-श्रीलंका यांच्यात सलामीची लढत,  वनडेतील सातत्य आता टी-20 मध्ये कायम राखण्याचे लक्ष्य

सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था

बहरातील भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासून (शनिवार दि. 1) खेळवल्या जाणाऱया आशिया चषक टी-20 स्पर्धेत वनडे क्रिकेटमधील विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. भारतीय महिला संघाने अलीकडेच इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वनडे मालिकाविजय संपादन केला असून यामुळे संघाचे मनोबल उंचावलेले असणे साहजिक आहे. आज आशिया चषक स्पर्धेतील सलामी लढत भारत-श्रीलंका महिला संघात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता खेळवली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

यंदा या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, थायलंड, श्रीलंका, मलेशिया, यूएई व यजमान बांगलादेश अशा 7 संघांचा समावेश आहे. 2020 मधील महिला आशिया चषक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली आणि त्यानंतर 2021 मध्ये ती रद्द करण्यात आली. यंदा प्रारंभी राऊंड रॉबिन पद्धतीने सर्व संघ परस्परांशी प्रत्येकी एक सामना खेळतील आणि या प्राथमिक फेरीअखेर गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

आशिया चषक स्पर्धा प्रारंभी वनडे प्रकारातून खेळवली जात असे. मात्र, 2012 पासून त्यात बदल केला गेला आणि ही स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जाऊ लागली. भारताने त्यानंतर ही स्पर्धा आजवर दोनवेळा जिंकली असून यापूर्वी 2018 मध्ये त्यांना बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेच्या एकूण इतिहासात भारताने वनडे प्रकारात 4 वेळा तर टी-20 प्रकारात दोनवेळा जेतेपद मिळवले आहे. 

भारताला आतापर्यंत टी-20 क्रिकेट प्रकारात फारसे यश मिळालेले नाही. मात्र, आशिया खंडाचा विचार करता या इव्हेंटमध्ये भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणार आहे.

यापूर्वी, बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत टी-20 क्रिकेट महिला इव्हेंटचे पदार्पण झाले, त्यावेळी भारतीय महिला संघाने ऐतिहासिक रौप्यपदक मिळवले. त्यानंतर या महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत भारताला 1-2 असा पराभव पत्करावा लागला. पण, पुढे हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे मालिकेत रोमांचक विजय मिळवत त्याची बरीच भरपाई केली. त्याच मालिकेच्या माध्यमातून झुलन गोस्वामीच्या कारकिर्दीची सांगता झाली.

भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकली असली तरी त्यावेळी दीप्ती शर्माने चार्ली डीनला तिसऱया व शेवटच्या वनडेत वादग्रस्त मंकडिंग पद्धतीने बाद केल्याने त्याला वादाचे गालबोट लागले होते. त्यातून बाहेर पडत आशिया चषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणे, हे आता भारतीय महिला संघाचे मुख्य लक्ष्य असणार आहे.

संभाव्य संघ

भारत ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्यूज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकुर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, केपी नावगिरे.

श्रीलंका ः चमारी अटापटू (कर्णधार), निलाक्षी डीसिल्व्हा, कविशा दिलहारी, अचिनी कुलसुरिया, सुगंदिका कुमारी, हर्षिता माधवी, मदुशिका मेथनंदा, हसिनी पेरेरा, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), कौशनी नुथ्यांगना, माल्शा शेहानी, रश्मी सिल्वा, थरिका सेवंदी.

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 1 वा.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.

Related Stories

लंकेचा बांगलादेशवर कसोटी मालिका विजय

Patil_p

खेलो इंडियातील ऍथलीट्सना सव्वा आठ कोटीचे वितरण

Patil_p

आदितीचे पदक हुकले

datta jadhav

भारतीय तिरंदाजांची किमान तीन पदके निश्चित

Amit Kulkarni

गुजरात, बेंगळूर बुल्सचे विजय

Patil_p

साबा करीम दिल्ली कॅपिटल्सचे टॅलेंट सर्च प्रमुख

Patil_p
error: Content is protected !!