गोसासे मंडळाच्या यशोदामिनी पुरस्कार प्रदान सोहळय़ात प्राध्यापिका डॉ. अनिता तिळवे यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी /पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळाने महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी यशोदामिनी पुरस्कार देऊन कर्तृत्ववान महिलांची पाठ थोपटताना त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. संयम आणि चिकाटी न सोडल्याने त्यांना यश प्राप्त झाले. यापुढे उत्तुंग भरारी घेऊन अधिकाधिक भरारी मारावी, असे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ. अनिता तिळवे यांनी केले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा यशोदामिनी पुरस्कार प्रदान सोहळय़ावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नाटय़लेखिका निलांगी शिंदे (धारगळ), नृत्य, गायन व क्रीडा क्षेत्रातील हेमा फडते (माशेल), साहित्य क्षेत्रातील योगादानाबद्दल मेघना कुरुंदवाडकर (मडगाव), सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पत्रकार अनुराधा मोघे (मडगाव), गरीब व होतकरू महिलांसाठी जनजागृती या संस्थेतर्फे कार्य करणाऱया अरुणा धुरी (केपे) यांचा डॉ. अनिता तिळवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाला 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. साहित्य क्षेत्रातील गोव्यातील ही सर्वांत जुनी संस्था असून हा पुरस्कार मिळायला भाग्य लागते, असे सत्कारमूर्ती मेघना कुरुंदवाडकर यांनी सांगितले.
या पुरस्काराने जबाबदारी वाढवली आहे. यापेक्षा भरीव आणि उत्तुंग कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मिळाली असून या मंडळाने उपेक्षितांच्या सदैव पाठीशी रहावे, असे आवाहन केले. यावेळी अरुणा धुरी आणि अनुराधा मोघे यांनी आपले विचार मांडले.
मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला व यापुढे गोव्याच्या कानाकोपऱयात मंडळाचे कार्यक्रम होतील, असे जाहीर केले.
पौर्णिमा देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर विठ्ठल गांवस यांनी आभार मानले. हेमंत खांडेपारकर, सुहास बेळेकर आणि प्रकाश तळवडेकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली.