दीडशेहून अधिक सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व, दोन आशियाई पदकांची मानकरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिडफिल्डमध्ये खेळणारी अनुभवी महिला हॉकीपटू नमिता टोपोने हॉकीमधून निवृत्त होत असल्याची गुरुवारी घोषणा केली. तिने 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2012 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
27 वर्षीय नमिता ही ओडिशातील सुंदरगड जिल्हाची रहिवासी असून 2014 व 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य व रौप्य मिळविलेल्या भारतीय संघाची ती सदस्य होती. ‘मागील दहा वर्षे हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. सर्वोच्च व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न याच कालावधीत साकार करता आले, याचा मला सर्वाधिक आनंद आहे. गेल्या दशकभरात भारतीय महिला हॉकीने उत्तुंग प्रगती केली असून माझाही त्यात सहभाग होता, या भावनेने मी रोमांचित झाले आहे. नव्या आयुष्याच्या वाटेवर चालताना मी भारतीय संघाला नेहमीच प्रोत्साहन व पाठिंबा देत राहीन,’ अशा भावना या मिडफिल्डरने व्यक्त केल्या.
राऊरकेलातील पानपोश स्पोर्ट्स हॉस्टेलची निर्मिती असलेल्या नमिताला 2007 मध्ये ओडिशा राज्य संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. स्थानिक स्पर्धेतील तिच्या प्रभावी कामगिरीने तिची 2011 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या यू-18 मुलींच्या आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात भारताने कांस्यपदक मिळविले. 2012 मध्ये डब्लिन येथे झालेल्या एफआयएच चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेसाठी तिची पहिल्यांदा वरिष्ठ संघात निवड झाली होती. 2013 मध्ये जर्मनीत झालेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक स्पर्धेतही ती भारतीय कनिष्ठ संघाची सदस्य होती. यानंतर तिने अनेक प्रमुख स्पर्धांत भाग घेतला. त्यात 2013 महिलांची वर्ल्ड लीग राऊंड 2 ज्यात भारताने सुवर्ण मिळविले, त्याच वर्षी झालेली महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा (रौप्य) यांचा समावेश आहे. 2014 मधील राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा, 2016 मधील रिओ ऑलिम्पिक्स यातही तिने भाग घेतला होता. हॉकीतील तिच्या योगदानाबद्दल हॉकी इंडियाने तिचे अभिनंदन करीत भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तिने एकूण 168 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.