वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात 15 ते 26 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेची महिलांची 2023 सालातील विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती लोव्हलीना बोर्गोहेन तसेच विद्यमान विश्व चॅम्पियन निखात झरीन भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
दिल्लीत होणाऱया या स्पर्धेत लोव्हलीना 75 किलो वजन गटात सहभागी होणार असून तिने यापूर्वी टोकियो ऑलिपिक स्पर्धेत कांस्यपदक तसेच दोन वेळेला विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदके मिळविली आहेत. तसेच 50 किलो वजन गटात भारताची निखात झरीन या स्पर्धेतील आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाली आहेत. 2022 साली इस्तंबुल येथे झालेल्या विश्व महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत निखात झरीनने सुवर्णपदक मिळविले होते. तसेच 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी भारताची नितू गंगाज 48 किलो गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याचप्रमाणे 54 किलो गटात प्रिती तसेच 70 किलो गटात सनामाच्या चानू भारतातर्फे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जस्मिन लंबोरिया 60 किलो वजन गटात भाग घेत 81 किलो वजन गटात स्वामी बोरा भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून तिने 2014 साली दक्षिण कोरियात झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. युवा विश्व मुष्ठीयुद्ध स्पर्धेतील विजेत्या साक्षी चौधरी (52 किलो), शशी चोप्रा (63 किलो), मंजु बांबोरिया (66 किलो) तसेच नुपूर शेरॉन (81 किलो वरील) गटात भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 20 कोटी रुपये असून त्यापैकी 10 कोटी रुपये विविध गटातील सुवर्णपदक विजेत्यांसाठी तर रौप्यपदक आणि कांस्यपदक विजेत्यांमध्ये प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात येईल.
भारतीय महिला मुष्टीयुद्ध संघ – नितू गंगाज, निखात झरीन, साक्षी चौधरी, प्रिती, मनिषा मौन, जस्मिन लंबोरिया, शशी चोप्रा, मंजु बंबोरिया, सनामाचा चानू, लोव्हलीना बोर्गोहेन, स्वाती बोरा आणि नुपूर शेरॉन.