वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 सालातील महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले असून सदर स्पर्धा दिल्लीमध्ये 15 ते 31 मार्च दरम्यान आयोजित केली आहे. प्रत्येक दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जात असून आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात भारताला तिसऱयांदा यजमानपदाची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेसाठी यजमान दिल्लीने आतापासूनच पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. 2001 साली सदर स्पर्धा भरवली गेली नव्हती. भारतामध्ये 2006 आणि 2018 साली सदर स्पर्धा झाली होती. त्याचप्रमाणे 2017 साली विश्व युवा महिलांची मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतामध्ये घेतली गेली होती. सदर स्पर्धा गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आली होती पण पुरुषांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा आतापर्यंत एकदाही भारतामध्ये झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीला सदर स्पर्धा तिसऱयांदा भरवण्याची संधी मिळाली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना आणि अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशन यांच्यातील बैठकीमध्ये या स्पर्धेसंदर्भात अधिकृत स्वाक्षऱया झाल्या होत्या. विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी अलीकडेच भारताला भेट दिली होती. महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय मुष्टीयुद्ध क्षेत्राला अधिक चालना मिळेल, अशी आशा अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीत होणाऱया महिलांच्या आगामी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा विविध 12 वजन गटामध्ये घेतली जाईल. 48, 50, 52, 54, 57, 60, 63, 66, 70, 75, 81 आणि 81 किलोवरील गटामध्ये विविध देशांचे स्पर्धक आपला सहभाग दर्शवणार आहेत. मुष्टीयुद्ध क्षेत्रामध्ये भारताने अलीकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. आशियाई, विश्व चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय महिलांनी आतापर्यंत 39 पदके मिळवली असून त्यामध्ये 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे.