वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ओडिशामध्ये होणाऱया फिफा 2022 महिला 17 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेच्या भुवनेश्वर शहर लोगोचे (स्पर्धाचिन्ह) राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सदर प्रतिष्ठेची स्पर्धा ओडिशासह महाराष्ट्र, गोवा अशा तीन प्रमुख राज्यांमध्ये खेळविली जाणार आहे. त्यामध्ये राजधानी भुवनेश्वरचा समावेश आहे. ओडिशा राज्याला पहिल्यांदाच फिफाच्या या स्पर्धेचे यजमानपद भुषविण्याची संधी लाभली आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर शनिवारी या स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केले.
क्रीडाक्षेत्रामध्ये ओडिशा राज्य आघाडीचे क्रीडाकेंद्र बनले असल्याबद्दल पटनाईक यांनी समाधान व्यक्त केले. या आगामी स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी फिफाने ओडिशाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल पटनाईक यांनी आभार मानले आहेत. या स्पर्धेमुळे देशातील महिला फुटबॉल क्षेत्राला नवी चालना मिळणार असून यजमान भारतीय महिला फुटबॉल संघाचे या स्पर्धेतील प्राथमिक गटातील सर्व सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ओडिशातर्फे आकर्षक लोगो तयार करण्यात आला आहे. सदर स्पर्धा देशातील फुटबॉल शौकिनांना पर्वणीच ठरेल. या आगामी स्पर्धेत यजमान भारत, अमेरिका, मोरोको आणि ब्राझील यांचा एकाच गटात समावेश आहे. या स्पर्धेसाठी शौकिनांना तिकीट खरेदीसाठी फिफा वेबसाईटवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.