पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य यांचे आवाहन : दीपावली विशेष दत्तगुरुवार कार्यक्रम
कुंडई : सर्वांनी एकमेकांना सहाय्यभूत, आधार देऊन सर्वांच्या जीवनात प्रकाश पसरविण्याचा संदेश हा दीपावलीचा सण आम्हाला देतो आहे. या उत्सवामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील, विविध धर्म, जाती, पंथातील लोक सहभागी झालेले आहेत. एक दीप दुसऱया दीपाकडे बघतो त्यावेळी प्रकाश मोठा दिसोत. पण दीप दोनच असतात. आम्ही सर्वजण चांगली लोकं एकमेकांना आधार दिला व एकमताने कार्य केल्याने सज्जन समाज तयार होईल, असे शब्दांत श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री सद्?गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी संबोधन केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे दीपावली विशेष दत्तगुरुवार भक्ति उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व धर्मातील आणि सर्व राजकीय लोकांनी आपल्या गोवा प्रगतीशील होण्यासाठी एकत्रित कार्य करण्याची गरज आहे. आपला धर्म मोठा तेव्हाच ज्यावेळी आम्हाला समोरचा धर्म सुद्धा मोठा दिसणार, ज्यावेळी आम्ही एकमेकांना मोठं करणार त्यावेळी आपला देश मोठा होणार, असेही ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर ऍड. ब्राह्मीदेवी, वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, आलेक्स रेजिनाल्ड, उल्हास तुयेकर, उद्योजक जिन्हा शेख, पत्रकार अवित बगळे, मांदे सरपंच अमित सावंत, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
देव, देश, धर्म किंबहुना संस्कृतीचा विचार करुया : माविन गुदिन्हो
पद्मश्री विभूषित तसेच ग्लोबल पीस अवॉर्ड प्राप्त सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामींच्या कार्याचा लौकिक जगभर पसरलेला आहे. सर्व जाती, धर्मियांना ते संघटित करीत आहे. या कर्तृत्वशैलीमुळे आपण सगळे एक आहोत, अशी भूमिका न कळत सर्वांमध्ये येत असते. माणूस म्हणून आम्ही आपल्या देव, देश, धर्म किंबहुना आपल्या संस्कृतीचा विचार करुया. असे प्रतिपादन वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
सूत्रसंचालन – वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील व श्रीराज शेलार यांनी केले.