शैक्षणिक क्षेत्रात उत्तम बदल घडवू : शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भविष्यात विविध क्षेत्रांचा विकास होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 साठी विद्यार्थ्यांना सज्ज बनवून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम बदल घडविण्यात येईल, असे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
बुधवारी येथील महात्मा गांधी भवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 वरील कार्यशाळेत ते बोलत होते. राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. 34 वर्षांनंतर प्रथमच शैक्षणिक धोरण अंमलात आणले जात आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात बदल होणार आहे, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. आपला देश बलवान व्हायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल झाला पाहिजे. गुणवत्तेचे शिक्षण दिले पाहिजे. या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळणार आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हे या धोरणाचा उद्देश आहे. प्राथमिक स्तरापासूनच बदल घडविण्यासाठी नवे धोरण अंमलात आणण्यात आले आहे. महात्मा गांधींजींचे हेच स्वप्न होते, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, हणमंत निराणी, जिल्हाशिक्षणाधिकारी गजानन मण्णिकेरी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.