पीव्ही सिंधूच्या गैरहजरीत लक्ष्य सेन, प्रणॉय यांच्यावर भारताची भिस्त
वृत्तसंस्था/ टोकियो
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 सालातील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू खेळताना दिसणार नाही. दुखापतीमुळे तिने माघार घेतल्याने लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यावरच भारताची मुख्य भिस्त राहिल.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची ही सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने आतापर्यंत पाच पदके मिळविली असून त्यामध्ये 2019 मधील सुवर्णपदकाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने शानदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत सिंधूला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिने टोकियोतील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आता तिच्या गैरहजरीत या स्पर्धेत भारताची भिस्त प्रामुख्याने लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय तसेच किदांबी श्रीकांत यांच्यावर राहिला. 2011 पासून या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एकदाही पदकविना राहिलेले नाहीत.
2021 साली झालेल्या या स्पर्धेत पुरुष विभागात किदांबी श्रीकांतने रौप्य तर लक्ष्य सेनने कांस्यपदक मिळविले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांना विविध देशांच्या अनेक अव्वल बॅडमिंटनपटूंकडून कडवे आव्हान असेल. जपानचा मोमोटा, इंडोनेशियाचे जोनातन क्रिस्टी आणि ऍन्थोनी जिनटिंग यावेळी या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. 2022 चा बॅडमिंटन हंगाम लक्ष्य सेनला खूपच लाभदायक ठरला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पणातच त्याने सुवर्णपदक मिळविले असल्याने टोकियोतील स्पर्धेत त्याचा आत्मविश्वास निश्चितच उंचावेला असेल.
20 वर्षीय लक्ष्य सेनचा या स्पर्धेतील सलामीचा सामना डेन्मार्कच्या वयस्कर हेन्स सोलबर्ग व्हिटिंगहसबरोबर होणार आहे. अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने रौप्यपदक मिळविले होते. तसेच गेल्या मे महिन्यात श्रीकांत आणि प्रणॉय लक्ष्य सेन यांनी भारताला प्रथमच थॉमस चषक जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. टोकियोतील या स्पर्धेत नवव्या मानांकित लक्ष्य सेनला कदाचित तिसऱया फेरीत प्रणॉयशी लढत द्यावी लागेल. 2022 च्या बॅडमिंटन हंगामामध्ये एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीत सातत्य दिसून येते. त्याने तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली तर एका स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. बाराव्या मानांकित किदांबी श्रीकांतची बँकॉक स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाली. तसेच थॉमस चषक स्पर्धेत त्याने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत श्रीकांतला मलेशियाच्या नवोदित याँगकडून हार पत्करावी लागली होती. दरम्यान त्याने या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. भारतीय संघातील साई प्रणितचा सलामीचा सामना तैवानच्या चेनबरोबर होईल. टोकियोमधील स्पर्धेत प्रामुख्याने चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रनकिरेड्डी यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहिल. या जोडीने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले होते. तसेच गेल्या जानेवारीत या जोडीने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते.
महिला विभागात पी. व्ही. सिंधूच्या गैरहजरीत 32 वर्षीय सायना नेहवालकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. यापूर्वी सायनाने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक मिळविले होते. वारंवार दुखापत आणि फॉर्म गमविल्याने सायनाला यापूर्वी काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. टोकियोतील स्पर्धेत अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्कीरेड्डी, गायत्री गोपीचंद व त्रिसा जॉली या भारतीय महिला बॅडमिंटनपटू दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. 2018 आणि 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या या महिला बॅडमिंटनपटूनी कांस्यपदक मिळविले होते.