यजमान कतार-इक्वेडोर लढतीने स्पर्धेस प्रारंभ, इक्वेडोरचे पारडे जड
वृत्तसंस्था/ दोहा
यजमान कतार व इक्वेडोर यांच्यातील लढतीने बहुप्रतीक्षित कतार फुटबॉल विश्वचषक महासंग्रामाला आजपासून सुरुवात होत असून मानवाधिकार, स्थलांतरित कामगार, एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर व क्वीर) समुदाय आणि बीयर यासारख्या मुद्दय़ांवर येथील राजेशाहीच्या धोरणांवर होणारी टीका या स्पर्धेमुळे मागे पडेल, अशी आशा केली जात आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होणार आहे.
कतारसाठी हा राष्ट्रीय गौरवाचा क्षण असला तरी त्यांच्या संघाला सर्वात मोठय़ा आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कतार संघ गट अ मध्ये असून याच गटात सेनेगल व नेदरलँड्स यांचा समावेश आहे. विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिका हा एकमेव असा यजमान देश आहे जो या स्पर्धेत गटसाखळी फेरी पार करण्यात अपयशी ठरला आहे. 2010 मध्ये ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती. अशी नामुष्की टाळण्याचे कतारसमोर मुख्य आव्हान असेल. हे आव्हान पार केल्यास ते त्यांचे मोठे यश मानले जाईल. आजच्या सामन्यात कतारला विजय मिळविण्याची चांगली संधी आहे. कारण फिफा क्रमवारीत इक्वेडोर त्यांच्यापेक्षा फक्त पाच स्थानांनी पुढे आहे. इक्वेडोर सध्या 44 व्या क्रमांकावर आहे.
अनेक वर्षापासून कतार संघ या स्पर्धेची तयारी करीत असून संघाने यासाठी 2019 कोपा अमेरिका व 2021 मधील कॉन्कॅकॅफ गोल्ड कप स्पर्धेही भाग घेतला होता. मात्र 2019 मध्ये कतारने आशियाई चषक जिंकत आपली क्षमता दाखवून दिली असून या स्पर्धेत ते एखाद्या बडय़ा संघाला धक्काही देऊ शकतात. आशियाई चषक जेतेपदाचे श्रेय प्रशिक्षक फेलिक्स सांचेझ यांच्या हुशारीला देण्यात येते. 2017 पासून ते या संघाशी जोडले गेले आहेत. त्याआधी ते कतारच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. कतार संघाच्या आशिया चषकातील यशाची तुलना येथील स्पर्धेशी केली जाणे गैर आहे. कारण या स्पर्धेचा स्तर अतिशय वरचा असून त्यात दर्जेदार फुटबॉल पहावयास मिळते.
सांचेझ यांना संघाकडून अपेक्षा
प्रशिक्षक सांचेझ यांना संघाकडून या स्पर्धेत खूप अपेक्षा आहेत. ‘आम्ही संघाला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्यावर दबाव असणार, याची आम्हाला जाणीव आहे. त्यात आम्ही आणखी भर टाकणार नाही. आम्ही नेहमीसारखी दिनचर्या ठेवणार असून सभोवती होणाऱया चर्चेपासून त्यांना अलग ठेवत सर्वोत्तम योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. 60000 प्रेक्षकांसमोर प्रदर्शन करणे कठीण आहे. हा विश्वचषकातील पहिला सामना असल्याने तुमच्याकडून मोठय़ा अपेक्षा केल्या जातात. त्या पूर्ण करणे कठीण असले तरी त्यांना मिळणारा नवा अनुभव भविष्यात निश्चितच उपयोगी ठरेल,’ असे ते म्हणाले.
इक्वेडोर संघ कतारवर विजय मिळविण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मात्र या संघाला पात्रता फेरीत एक अयोग्य खेळाडू खेळविल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचा डिफेंडर बायरन कॅस्टिलोचा संबंध कोलंबियाशी असल्याने तो अवैधरीत्या इक्वेडोरकडून पात्रता फेरीत खेळत असल्याचा आरोप चिली व पेरू संघांनी केला होता. मात्र क्रीडा लवादाने त्यांचा आरोप फेटाळून लावल्याने इक्वेडोरची पात्रता कायम राहिली. पण 2026 मधील स्पर्धेच्या पात्रता फेरीआधी इक्वेडोरचे तीन गुण कमी केले जाणार आहेत. कॅस्टेलोबाबत जन्मतारीख व जन्म ठिकाण याबाबत पासपोर्ट मंजूर करताना चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे. कॅस्टिलोला नंतर प्रशिक्षक गुस्तावो अल्फारो यांनी या स्पर्धेसाठी 26 जणांच्या संघातून वगळले. कतार व इक्वेडोर या दोन्ही संघांबाबत बाहेर इतकी चर्चा झाली असताना आता रविवारपासून त्यांचे लक्ष फक्त फुटबॉलवर केंद्रित होणार आहे.
आजचा सामना
कतार वि. इक्वेडोर
वेळ ः रात्री 9.30 वाजता
थेट प्रक्षेपण ः स्पोर्ट्स 18, स्पोर्ट्स 18 एचडी
लाईव्ह स्ट्रीमिंग ः जिओसिनेमा ऍप.