वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2023 साली भारतात होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या लोगोचे येथे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर स्पर्धा ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि रूरकेला या दोन शहरामध्ये भरविली जाणार आहे.
सदर स्पर्धा 13 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. यापूर्वी म्हणजे 2018 साली भारतामध्ये ही स्पर्धा भरविली गेली होती. आता सलग दुसऱयांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला मिळाली आहे. या स्पर्धेसाठी देशातील सर्वात मोठय़ा हॉकी स्टेडियमचे बांधकाम सध्या सुरू आहे. या नव्या स्टेडियमची क्षमता सुमारे 20 हजार शौकिनांची असेल. हॉकी इंडिया आणि त्यांचे अधिकृत पार्टनर ओडिशा यांच्या संयुक्त विद्यमाने ही जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेची विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पटनाईक यांनी दिली. या समारंभाला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.