वृत्तसंस्था /टेरेसा (स्पेन)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये जगातील अव्वल 16 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस राहील. या स्पर्धेत हॉलंडचा संघ संभाव्य विजेत्यासाठी फेवराईट म्हणून ओळखला जातो.
हॉलंडच्या (नेंदरलँडस्च्या) महिला हॉकी संघाने आतापर्यंत ही स्पर्धा विक्रमी आठवेळा जिंकली आहे. यावेळी हॉलंडचा महिला हॉकी संघ या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रीक नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा 1 ते 17 जुलै दरम्यान खेळविली जाणार आहे. हॉलंडने या स्पर्धेत आतापर्यंत चारवेळा उपविजेतेपद मिळाले असून त्यांनी चारवेळा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके, दोनवेळा रौप्यपदके आणि तीनवेळा कास्यपदके मिळविली आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱया अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या संघानी आतापर्यंत प्रत्येकी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेसाठी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत क गटातील यजमान स्पेन आणि कॅनडा यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 1983 साली कौलालंपूर येथे झालेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत स्पेनने उपविजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत सहभागी झालेले 16 संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी थेट पात्र ठरतील तर प्रत्येक गटातील दुसऱया आणि तिसऱया स्थानावरील संघांमध्ये सामने खेळविले जाणार असून त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील अन्य चार संघ निश्चित होतील. अ गटामध्ये जर्मनी, चिली, आयर्लंड, हॉलंड, ब गटामध्ये भारत, चीन, इंग्लंड आणि न्यूझीलंड, क गटामध्ये अर्जंटिना, कॅनडा, कोरिया आणि स्पेन तसेच ड गटामध्ये ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जपान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघाने चालूवर्षीच्या मे मे महिन्यात मानांकनात सर्वोच्च म्हणजे सहावे स्थान मिळविले आहे.