कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
World Health Mental Day 2022 : कोरोनापुर्वी मनोविकाराचे रूग्ण नियमित येत होते, लॉकडाऊन झाले अन् ते विखुरले… काहींचे जॉब गेले, अन् आर्थिंक कोंडी सुरू झाली, त्यातून आलेल्या तणावातून अनामिक भीतीही वाढली, डिप्रेशन आले. कोरोना कमी झाला,अन् त्यांनी डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले.. जिल्ह्य़ात कोरोनानंतर मनोविकारग्रस्तांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली आहे. त्यातही 20 ते 40 वयोगटातील वाढलेला मनोविकार धोक्याचा इशारा देत आहे. सोमवारी जागतिक मनोविकार जागृती दिन. या पार्श्वभूमीवर ‘सीपीआर’मध्ये मनोविकारावर होणाऱ्या उपचारातून समोर आलेले हे वास्तव चित्र…
पुर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत मनोरूग्णाला व्यक्ती म्हणून दिलासा मिळे, त्याला त्याची जाणीवही नसायची.पण विभक्त कुटुंबपद्धती आली,अन् मनोविकारग्रस्तांची कोंडी सुरू झाली, मनोविकारावर मानसोपचार, समुपदेशनातून उपचारही सुरू झाले.कित्येकजण मनोविकारातून मुक्त झाले,दोन वर्षांपुर्वी जगभर कोरोनाची लाट आली.कोल्हापूर जिल्हय़ातही कोरोना आला,अन् मार्च 2020 मध्ये सीपीआर हॉस्पिटल कोरोना आयसोलेटेड झाले.त्यानंतर दीड वर्षांनी सीपीआर हॉस्पिटल पुन्हा सुरू झाले.येथील मनोविकार वॉर्डही सुरू झाला.पण दीड-दोन वर्षांत नियमित उपचार घेणारे मनोरूग्ण विखुरले गेल्याचे चित्र समोर आले आहे.
कोरोनाकाळात लॉकडाऊन झाले,अनेकांचे रोजगार बुडाले, जॉब गेले,अन् आर्थिक कोंडी सुरू झाली, त्यातून तणाव वाढत गेला, डिप्रेशन वाढले, अन् अशा मनोविकारग्रस्तांची संख्या वाढत गेली.यातील काहींनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, अशा 30 ते 40 जणांना सीपीआरच्या मानसोपचार विभागाने समुपदेशनातून बाहेर काढले, आज ते नियमित जीवन जगत आहेत,ही समुपदेशनाची सकारात्मक बाजूही समोर आली आहे.
महिन्याला सरासरी 1400 हून अधिक रूग्णांवर उपचार
सीपीआर हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात कोरोनापुर्वी दैनंदिन 60 ते 80 सरासरी ओपीडी होती. कोरोनानंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. दैनंदिन 100 ते 120 रूग्ण येथे तपासले जात आहेत. जानेवारीपासून महिन्याला सरासरी 1400 ते 1500 रूग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. मानसोपचार वॉर्डमध्ये 20 बेड आहेत, 10 महिला, 10 पुरूष रूग्णांसाठी ते आहेत. पाच डॉक्टरांच्या टीमसह 30 जणांचा स्टाफ येथे कार्यरत आहे. येथे आलेला रूग्ण भयमुक्त होऊनच घरी जातो, हे येथील मानसोपचाराचे यश आहे.
डिप्रेशन, अनामिक भीतीत अडकलेले रूग्ण अधिक
डॉ. विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनानंतर जिल्हय़ात मनोविकारग्रस्तांमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. यात 20 ते 40 वयोगटातील रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. पन्नाशीनंतरच्या मनोविकारांत 20 टक्के वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर झालेली आर्थिंक कोंडी याला कारणीभूत ठरली आहे. त्यातून डिप्रेशन, अनामिक भीतीतून मनोविकारात अडकलेल्यांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानसोपचार विभागप्रमुख डॉ. पवन खोत म्हणाले, येथे शॉक ट्रिटमेंट पुर्ववत सुरू झाली आहे. मेंदूचा आलेख ईईजीची यंत्रणाही आहे. कर्नाटक, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातून रूग्ण उपचारासाठी येतात. यातील 40 टक्के रूग्ण औषधोपचार, समुपदेशनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. अध्ययनदृष्टय़ा, बौद्धीकदृष्य़ा दिव्यांग 1500 विद्यार्थ्यांना तपासणी करून प्रमाणपत्रे दिली आहेत. महिन्याला हे प्रमाण 100 ते 120 इतके असल्याचे त्यांनी सांगितले.
जेलमधील 45 कैदी रूग्णांवरही मानसोपचार
कळंबा कारागृह आणि बिंदू चौक कारागृहातील कैद्यांना या वॉर्डद्वारे समुपदेशन केले जाते. डॉक्टर आणि समुपदेशकाची टीम प्रत्येक सप्ताहात तेथे जाते, आतापर्यत 20 रूग्णांना याद्वारे मानसोपचार देण्यात यश आले आहे. महिन्याला असे 40 ते 50 कैदी समुपदेशन, उपचारासाठी येथे येत असल्याचे डॉ. शीतल हारूगडे यांनी सांगितले.

