हिंदी भाषेचा विकास-प्रसार करण्याचा उद्देश
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदी भाषेचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक हिंदी संमेलने सुरू करण्यात आली. पहिले जागतिक हिंदी संमेलन 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात झाले. तेव्हापासून हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, असे विचार गोवा येथील सतीश धुरी यांनी मांडले.
केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय आणि आरएलएस विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदी दिवस साजरा झाला. यावेळी ते ‘हिंदी भाषा में रोजगार’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. ज्योती कावळेकर, डॉ. राजीव हिरेमठ, प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी, प्रा. अर्जुन कांबळे उपस्थित होते.
धुरी पुढे म्हणाले, हिंदी भाषेतून शिकणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनुवाद, वृत्त निवेदक, जाहिरात, अध्यापन, पत्रकारिता यामुळे हिंदीतून शिकण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
यावेळी जीवन खोत, प्रिती राजपुरोहित, मानसी वेताळे आदींनी हिंदी कविता सादर केल्या. विनायक पाटील यांनी परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन अरिबा मुल्ला यांनी केले. आभार हनिन सौदागर यांनी मानले.