सहा महिन्यात 212 जणांनी घेतले शिक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जागतिक साक्षरता दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. जिल्हा लोकशिक्षण समिती, जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य एस. बी. दासप्पण्णावर, प्रा. एन. आर. पाटील, जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी ए. एम. जयश्री, समन्वय अधिकारी महादेव मेदार आदींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के. उपस्थित होते.
मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. 20 शिक्षित कैद्यांची निवड करून त्यांच्याकरवी निरक्षर कैद्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम यशस्वी झाला आहे. यासाठी पेन, पेन्सील, नोटबुक, पुस्तके मोफत पुरविण्यात आली. निरक्षरांना शिकविलेल्या शिक्षित कैद्यांना 25 हजार रुपये मानधनही देण्यात
आले. सहा महिने चाललेल्या साक्षरता कार्यक्रमात 212 कैद्यांनी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. यापैकी 187 कैदी (170 पुरुष, 17 महिला) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एम. पाटील, एच. एस. बजंत्री, सुभाष वागुकर, एस. एम. कोलकार, जेलर भंडारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.