क्रिकेट स्टेडियममध्ये 7 हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा
चंदिगढ / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी सोहळय़ानिमित्त शनिवारपासून देशभरात तिरंगा यात्रेला सुरुवात झाली असतानाच पंजाबमध्ये अनोखा विश्वविक्रम झाला आहे. येथील क्रिकेट स्टेडियममध्ये मानवी साखळी करून तिरंगा तयार करण्यात आला. या तिरंग्यात सात हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या उपस्थितीत मानवी साखळीद्वारे तिरंग्याची प्रतिकृती साकारत विद्यार्थ्यांनी विश्वविक्रम नोंदवला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ऍडज्युडिकेटरचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी या विक्रमाची पडताळणी केली. राष्ट्रध्वज फडकावणाऱया सर्वात मोठय़ा मानवी प्रतिमेचा यापूर्वीचा जागतिक विक्रम अबुधाबीमध्ये जीईएमएस एज्युकेशनने केला होता. संयुक्त अरब अमिरातीने 2017 मध्ये 4,130 लोकांच्या सहभागातून मानवी राष्ट्रध्वजासह जागतिक विक्रम केला होता.
15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी सोहळय़ानिमित्त यंदा देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याचदरम्यान, चंदिगढमधील सेक्टर 16 येथील क्रिकेट स्टेडियमवर सर्वात मोठय़ा मानवी साखळीने तिरंगा फडकवण्यात आला. या साखळीत सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एनआयडी फाऊंडेशन आणि चंदिगढ विद्यापीठाने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मिनाक्षी लेखी, चंदिगढचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांची मुख्य उपस्थिती लाभली. पुरोहित यांनी या विक्रमाबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन करण्याबरोबरच राज्यातील जनतेला घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले.