Tarun Bharat

वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ

पदार्पणातच एच. एस. प्रणॉयचे सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष

वृत्तसंस्था/ बँकॉक

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व टूर बॅडमिंटन फायनल्स स्पर्धेला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटू सहभागी होणार असून भारताची भिस्त प्रामुख्याने एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीवर राहिल. मात्र, दुखापतीमुळे भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू सहभागी झाली नाही.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये एच. एस. प्रणॉय हा एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू पहिल्यांदाच सहभागी होत आहे. ही स्पर्धा यापूर्वी चीनमध्ये घेण्याचे ठरले होते पण कोरोनाचा प्रसार पुन्हा चीनमध्ये वाढत असल्याने सदर स्पर्धा बँकॉकमध्ये खेळविण्याचा निर्णय विश्व बॅडमिंटन फेडरेशनने घेतला. विश्व टूर बॅडमिंटन फायनल्स स्पर्धेमध्ये एच. एस. प्रणॉयचा अ गटात समावेश असून या गटामध्ये डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर ऍक्सेलसन, जपानचा कोडाई नाराओका, चीनचा लू ग्युआंग झू, यांचा समावेश आहे. अलीकडेच एच. एस. प्रणॉयचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. बँकॉकमधील या स्पर्धेत आपण सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास तृतीय मानांकित प्रणॉय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.

अ गटात प्रणॉयचा समावेश असून त्याला या गटातून उपांत्य फेरी गाठण्याची संधी अधिक आहे. एच. एस. प्रणॉयने टॉप सिडेड ऍक्सेलसनसमवेत सहा सामन्यात खेळ करताना एक सामना जिंकला असून पाच सामने गमाविले आहेत. गेल्या वर्षी इंडोनेशियात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने ऍक्सेलसनला पराभवाचा धक्का दिला होता. जपानच्या 21 वर्षीय नाराओकाविरुद्ध प्रणॉयचा एकमेव सामना गेल्या जुलैमध्ये सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत झाला होता आणि प्रणॉयला हार पत्करावी लागली होती. तसेच प्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या झू ने प्रणॉयवर मात केली होती. विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे 2022 च्या बॅडमिंटन हंगामातील सर्वोत्तम होतकरू बॅडमिंटनपटू पुरस्कारासाठी प्रणॉयची शिफारस करण्यात आली होती. गेल्या मे महिन्यात झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत एच. एस. प्रणॉयची कामगिरी दर्जेदार झाली होती. भारताने पहिल्यांदाच थॉमस चषकावर आपले नाव कोरले होते. तसेच प्रणॉयने स्वीस खुल्या सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद, इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आणि मलेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये प्रणॉयने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. वर्षभराच्या विविध स्पर्धांतील दर्जेदार कामगिरीमुळे प्रणॉयला विश्व टूर बॅडमिंटन फायनल्स स्पर्धेसाठी थेट पात्रता सिद्ध करता आली. डेन्मार्कच्या ऍक्सेलसनने 2022 च्या बॅडमिंटन हंगामात सलग 39 सामने जिंकून विश्वविक्रम नोंदवताना पाच सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेमध्ये चोयू चेन, जोनाथन क्रिस्टी, ऍन्थोनी गिनटींग आणि लोह किन येव हे सहभागी झाले आहेत. भारताच्या पी. व्ही. सिंधूने ही प्रतिष्ठेची स्पर्धा यापूर्वी एकदा जिंकली होती. तर भारताच्या समीर वर्माने 2018 साली झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. महिला एकेरीमध्ये विद्यमान विजेती ऍन से यंग, विश्वविजेती ऍकेनी यामागुची, ऑलिम्पिक विजेती चेन युफेई, बिंगजिओ यांचा समावेश आहे.

Related Stories

हिजाब बंदीचा निर्णय योग्यच

Patil_p

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Abhijeet Khandekar

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असणारा दीप सिद्धू अटकेत

Archana Banage

देशात दिवसभरात हजारपार मृत्यूंची नोंद

Patil_p

देशात 24 तासांमध्ये 1463 नवे बाधित

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 454 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

Tousif Mujawar