वृत्तसंस्था/ इमोला, इटली
येथे झालेल्या एमिलिया-रोमांगा ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावले तर त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझने दुसरे आणि मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने तिसरे स्थान मिळविले.
चॅम्पियनशिप रेसमध्ये आघाडीवर असणाऱया फेरारीच्या चार्लस लेक्लर्कला या शर्यतीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखेरच्या टप्प्यात त्याची गाडी स्पिन झाल्याने तो मागे पडला. फेरारीचा त्याचा संघसहकारी कार्लोस सेन्झच्या गाडीची पहिल्याच लॅपवेळी धडक बसल्याने त्याला निवृत्त व्हावे लागले. व्हर्स्टापेनने पोल पोझिशनवरून सुरुवात केली होती आणि वेगवान लॅप, जेतेपद मिळवित कारकिर्दीत दुसऱयांदा ग्रँड चिलेम साधले. या शर्यतीत त्याने एकूण 34 गुण मिळविले. मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने चौथे, अल्फा रोमिओच्या व्हाल्टेरी बोटासने पाचवे, अल्फा टॉरीच्या युकी सुनेदाने सातवे, ऍस्टन मार्टिनच्या सेबॅस्टियन व्हेटेलने आठवे, हासच्या केविन मॅग्नसेनने नववे, ऍस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले.