दत्तवाड-बोरगाव तपासणी नाक्यावर कारवाई : सदलगा पोलिसात घटनेची नोंद
सदलगा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा येथे दत्तवाड-बोरगाव रस्ता दुभाजकाजवळ तपासणी नाका उभारण्यात आला आहे. दरम्यान तपासणी नाक्यावर मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास 25 लाख ऊपयांच्या साड्या जप्त करण्यात आल्या. याबाबत सदलगा पोलिसात घटनेची नोंद झाली असून दत्तवाडहून रायबाग येथे सदर साड्या नेत असल्याचे समजते. यावेळी चालक आणि वाहकाकडे या साड्यांच्या वाहतुकीसंबंधी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर सदाशिव सत्तार यांनी सहकारी संघाचे साहाय्यक निबंधक, कचेरीचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. पीएसआय भरत एच. यांच्या नेतृत्वाखाली अमृत भरमू गुरव, गजानन लोकरे, एम. एम. फडतरे या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली, अशी माहिती सदलगा पोलीस निरीक्षक भरत एच. यांनी दिली.
वाहन (क्र. एमएच 09 एफएल 8491) मधून चालक खदीर दावरली शेख (ओंकार कॉलनी उचगाव, कोल्हापूर, ता. करवीर) व क्लिनर वसंत राजव्वा (आई) कांबळे (ब्याकूड, ता. रायबाग) हे दोघे विविध रंगाच्या पॉलिस्टर, पॅन्सी प्रत्येकी 500 ऊपये किमतीच्या पाच हजार साड्या दत्तवाडहून रायबागकडे नेत होते. सदलगा तपासणी नाक्मयावर चौकशीसाठी सदर वाहन अडविण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच खरेदीपावती, वाहतूक करण्यासाठी परवाना नोंदी असे काहीच चालक व क्लिनरकडे नव्हते. सदर वाहनाची किंमत 3 लाख आणि साड्यांची किंमत 25 लाख असा एकूण 28 लाखांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पीएसआय भरत एच. यांनी दिली. सीपीआय सोमशेखर जोट्टल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.