जस्सापट्टी व गुरप्रितसिंग, प्रितपाल फगवाडा व भोलन पहलवान या चार भारत केसरींची लढत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर यात्रोत्सवानिमित्त व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि. 28 एप्रिल रोजी लोकमान्य केसरी किताबासाठी भव्य कुस्त्यांचे आयोजन महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे करण्यात आले आहे. या आखाडय़ात प्रमुख कुस्ती भारताचा अव्वल मल्ल हिंद केसरी, भारत केसरी जस्सापट्टी व भारत केसरी गुरप्रितसिंग दिल्ली यांच्यात लोकमान्य केसरीसाठी लढत होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती प्रितपाल फगवाडा व हरियाणा केसरी भोलन पहलवान यांच्यात होणार आहे. या कुस्ती मैदानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज मालोजीराव भोसले, कोल्हापूर यांची खास उपस्थिती राहणार आहे. जवळपास 75 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची बसण्याची सोय संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
जस्सापट्टी हा दुसऱयांदा बेळगावात कुस्तीसाठी येणार असून, गुरप्रितसिंग सुद्धा प्रथमच बेळगावला येणार आहे. यावेळी जस्सापट्टी म्हणाले, ‘दक्षिण भारतातील मोठय़ा मैदानात कुस्ती करण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानावर कुस्ती करण्यासाठी संधी मिळाली आहे. या मैदानात आपण कुस्ती शौकिनांना निराश न करता झटपट व आकर्षक कुस्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण दिल्ली, पंजाब व हरियाणा या राज्यातून बेळगावबद्दल वारंवार चर्चा होत असते. या ठिकाणी अनेक मोठी कुस्ती मैदाने भरवली जातात. बेळगावमधील कुस्ती संघटना पंजाब, दिल्ली, हरियाणा येथून अव्वल मल्ल बोलावून कुस्ती करण्याची संधी मिळवून देतात. याच बेळगावात महाबली सतपाल यांनी आपला काळ गाजविला व येथेच कुस्तीला रामराम केला होता.’ गुरूप्रितसिंग हा भारत केसरी विजेता मल्ल असून, त्याने दिल्ली, पंजाब व हरियाणा येथील अनेक मल्लांचा पराभव करून आपला दबदबा निर्माण केला आहे.
दुसरी कुस्ती पंजाब केसरी प्रितपाल फगवाडा व हिंद केसरी भारत केसरी भूपेंद अंजनाला यांच्यात होणार होती. पण येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेने भूपेंद्र अंजनाला वगळून त्या ठिकाणी हरियाणा केसरी भोलन पहलवान याच्याबरोबर कुस्ती ठेवण्यात आली आहे. आता दुसऱया क्रमांकाची लढत प्रितपाल फगवाडा व भोलन पहलवान यांच्यात होणार आहे.
तिसऱया क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी सोलापूर गंगावेस तालमीचा सिकंदर शेख व दिल्ली केसरी, हरियाणा केसरी दिल्लीचा रोहित चौधरी यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती उत्तर भारत केसरी हरियाणाचा संतू गुज्जर व महान भारत केसरी गंगावेसचा माऊली जमदाडे यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तीक काटे दावणगेरी व हिमाचल केसरी विकास खन्ना यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.