आयपीएल साखळी फेरी : मनोबल उंचावलेल्या दिल्लीसमोर राजस्थानचे आव्हान, मुख्य प्रवाहात परतण्यासाठी महत्त्वाकांक्षी कुलदीपची बटलरविरुद्ध जुगलबंदीची अपेक्षा
वृत्तसंस्था /मुंबई
यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव हे दोन मनगटी फिरकीपटू आज (शुक्रवार दि. 22) राजस्थान रॉयल्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल साखळी सामन्याच्या निमित्ताने आमनेसामने भिडणार आहेत. विद्यमान ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर (375 धावा) व पर्पल कॅप होल्डर यजुवेंद्र चहल (17 बळी) समाविष्ट असल्याने राजस्थानचा संघ बळकट आहे तर मागील लढतीत दिल्लीने पंजाबचा एकतर्फी फडशा पाडला असल्याने त्यांचेही मनोबल उंचावलेले आहे. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ अद्याप कोरोनाच्या धक्क्यातून पूर्ण सावरलेला नाही. मात्र, यानंतरही नेटाने खेळण्यावर त्यांचा भर असणार आहे. 13 बळींसह दुसऱया स्थानी विराजमान असणारा कुलदीप यादव बहरातील बटलरला रोखण्यासाठी प्रयत्नशील असेल, हे साहजिक आहे. दिल्लीकरिता कुलदीप, अक्षर पटेल व ललित यादव हे फिरकी त्रिकुट वानखेडेच्या ट्रकवर धावांची आतषबाजी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. यजुवेंद्र चहल नेहमीच धोकादायक ठरत आलेल्या वॉर्नर-पृथ्वी शॉ व कर्णधार रिषभ पंत यांच्याविरुद्ध कोणती रणनीती अवलंबणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. 2017 ते 2019 या कालावधीत रवी शास्त्री-विराट कोहली यांच्या पर्वात कुल-चा या टोपण नावाने ओळखले जाणारे कुलदीप व चहल हे प्रथम पसंतीचे फिरकीपटू होते. हेच दिग्गज आता आज आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडतील. चहलला त्यानंतर मागील टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून वगळल्याने मोठा धक्का बसला होता.
ट्रेंट बोल्ट-मकॉयविरुद्ध दिल्लीच्या फलंदाजांचा कस लागणार का?
आजच्या लढतीत ट्रेंट बोल्ट-पृथ्वी शॉ यांच्यात जुगलबंदी रंगणार का, याची प्रारंभीच चुणूक दिसेल. मात्र, राजस्थानच्या ताफ्यात आता ओबेड मकॉयसारखा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट बहरात आला असल्याने त्यांची गोलंदाजी आणखी मजबूत असेल. मकॉयने केकेआरविरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळवून देत आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती.
मकॉय आपल्या ताडमाड उंचीचा पुरेपूर लाभ घेत अँगल्स व लेंग्थवर दिल्लीच्या फलंदाजांना चकवे देण्याची क्षमता राखून असेल. दिल्लीकडे मध्यफळीत कर्णधार पंतचा अपवाद वगळता एकही तगडा भारतीय फलंदाज उपलब्ध नाही, ही थोडीफार चिंतेची बाब ठरु शकते. मनदीप सिंग अद्याप अपयशीच ठरत आला असून सर्फराजला सूर मिळणे या संघासाठी महत्त्वाचे असेल. रोव्हमन पॉवेलने आत्मघातच अधिक केले असून त्यालाही आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव ज्युनियर, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, जोस बटलर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, नॅथन कोल्टर-नाईल, जिम्मी नीशम, डॅरेल मिशेल, करुण नायर, ओबेड मकॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.