सेरेब्रल एन्यूरिजमला देत आहेत तोंड ः मागील वर्षी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे ‘सेरेब्रल एन्यूरिजम’ (एकप्रकारचा मेंदूशी संबंधित आजार) पीडित असून त्यांना यामुळे मागील वर्षी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. जिनपिंग हे शस्त्रक्रियेऐवजी पारंपरिक चिनी औषधांद्वारे स्वतःवर उपचार करवून घेत आहेत. या औषधांच्या वापरामुळे मेंदूमधील रक्तपेशीं नरम होत असल्याचे सांगण्यात येते.
जिनपिंग यांच्या आरोग्यावरून दीर्घकाळापासून कयास वर्तविण्यात येत आहेत. त्यांनी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या पूर्वी कोरोना लाट संपल्यावरही विदेशी नेत्यांची भेट घेणे टाळले होते. त्यानंतर ते आजारी असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
यापूर्वी मार्च 2019 मध्ये इटली दौऱयादरम्यान त्यांचे पाय लडखडल्याचे दिसून आले होते. तर फ्रान्समध्ये पोहोचल्यावर त्यांना बसण्यासाठी मदत घ्यावी लागली होती. अशाच प्रकारे ऑक्टोबर 2020मध्ये शेनझेन येथील भाषणादरम्यान त्यांचा आवाज क्षीण वाटत होता आणि ते सातत्याने खोकत होते. तेव्हा देखील ते आजारी असल्याच्या संशयाला बळ मिळाले होते.
सेरेब्रल एन्यूरिजम म्हणजे काय?
सेरेब्रल एन्यूरिजमने ग्रस्त व्यक्तीच्या मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होतात. 50 वर्षांपर्यंत अधिक वयाचे लोक किंवा उच्च रक्तदाब, आनुवंशिक आजार, संसर्ग किंवा डोक्याला ईजा आणि तणावग्रस्त लोकांना या आजाराला तोंड द्यावे लागते. हा आजार मेंदूच्या कुठल्याही भागात होऊ शकतो. तीव्र डोकेदुखी, हातपाय बधिर होणे, सातत्याने थकवा आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
अर्थव्यवस्थेवरून चिंतेत जिनपिंग
मागील काही काळापासून चिनी अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. युक्रेन युद्धामुळे चीनमध्ये गॅस आणि इंधनाच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. तर झिरो कोविड धोरणामुळे अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. या सर्व कारणांमुळे जिनपिंग मोठय़ा तणावात आहेत. हा तणाव देखील त्यांच्या आजाराचे एक प्रमुख कारण असू शकते.