चीनच्या विदेश मंत्रालयाची पुष्टी ः पुढील आठवडय़ात पुतीन यांना भेटणार
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे पुढील आठवडय़ात रशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. मॉस्कोमध्ये क्षी जिनपिंग हे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. रशिया-युक्रेन दौऱयादरम्यान जिनपिंग यांचा हा दौरा होत असल्याने याकडे जगाच्या नजरा लागून राहणार आहेत.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे 20 मार्चपासून रशियाच्या तीन दिवसीय दौऱयावर असतील असे चीनच्या विदेश मंत्रालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. चीनमध्ये अध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ प्राप्त केल्यावर जिनपिंग यांचा पहिला विदेश दौरा ठरणार आहे. जिनपिंग हे 20-22 मार्चपर्यंत रशियाच्या दौऱयावर असणार आहेत. त्यांच्या या दौऱयादरम्यान रशिया आणि चीन यांच्यात व्यापक भागीदारी आणि सामरिक सहकार्यासमवेत सामायिक मुद्दय़ांवर चर्चा होणार असल्याचे क्रेमलिकडून सांगण्यात आले.
चिनी अध्यक्षांचा रशिया दौरा जागतिक तज्ञांदरम्यान चर्चेचा विषय ठरला आहे. क्षी जिनपिंग यांचा हा दौरा रशिया आणि चीन हे अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर असताना होत आहे. या दोन्ही देशांसोबत अमेरिकेचे अनेक मुद्दय़ांवरून वाद सुरू आहेत. युक्रेन युद्धात अमेरिकेने रशियाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तर चीन अन् अमेरिकेचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. अशा स्थितीत रशिया आणि चीनची वाढती जवळीक अमेरिकेच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
युक्रेन युद्धात मध्यस्थी?
चीनने अलिकडेच दोन इस्लामिक देश सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील कित्येक वर्षांपासूनचे शत्रुत्व दूर करत तडजोड घडवून आणली होती. अशा स्थितीत चिनी अध्यक्ष आता रशिया आणि युक्रेन यांच्यात मध्यस्थी करणार असल्याचे मानले जात आहे. युक्रेनच्या अध्यक्षांशी ते फोनवरून चर्चा करणार असल्याचे मानले जातेय. तर चीन शांतता प्रस्थापित करत जगाचे नेतृत्व मिळवू पाहत आहे.