वार्ताहर /किणये
यळेबैल येथील जीर्णोद्धार करण्यात येत असलेले दुर्गामाता मंदिराचा चौकटपूजन सोहळा मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. गावातील दुर्गामाता हे जागृत देवस्थान असून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्यामुळे गावकऱयांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दुर्गामाता सार्वजनिक युवक मंडळ व पंचकमिटी यळेबैल यांच्यावतीने जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे.
गुरुवारी चौकटीची मिरवणूक काढण्यात आली. खाचू शहापूरकर व अरुण पाटील यांनी चौकटीसाठी लागणारा खर्च देणगीस्वरुपात दिला आहे. राकसकोप येथील प्रभू सुतार यांनी चौकट बनविली आहे. गुरुवारी सकाळी राकसकोप येथून सजविलेल्या ट्रक्टरमधून चौकटीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन डॉ. राजू धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये सुवासिनी कलश घेऊन मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण यळेबैल गावात ही मिरवणूक काढण्यात आली.
शुक्रवारी मंदिराचा चौकटपूजन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पा मरगाळे हे होते. चौकटीचे पूजन खाचू शहापूरकर व अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मल्लाप्पा येळ्ळूरकर, सिद्धराम पेडणेकर, रवी बाळेकुंद्री, गणपती पाटील, पंतोजी येळ्ळूरकर, बाळू येळ्ळूरकर, रघुनाथ पाटील, निंगाप्पा शहापूरकर, गणपती केसरकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पंचकमिटीचे अध्यक्ष गुंडू पाटील व गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दुर्गामाता युवक मंडळाचे अध्यक्ष नामदेव मरगाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.