ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शाहू घराण्यातील युवराज आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यशवर्धन राजवर्धन कदमबांडे (Yashvardhan Kadambande) शिवबंधनात अडकणार आहेत. आज सायंकाळी “मातोश्रीवर” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कदमबांडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यशवर्धन हे धुळे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र आहेत. यशवर्धन हे भाजपचे उपाध्यक्ष होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताला यशवर्धन यांनी दुजोरा दिला असून, वडिल राजवर्धन कदमबांडे माझ्यावर कोणताही निर्णय लादत नाहीत. हा निर्णय माझा वैयक्तिक आहे. मी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून आता राजकारणात सक्रिय होणार आहे. उद्धव ठाकरेंचे अडीच वर्षातील काम पाहून मी प्रभावित झालो आहे. शिवसेनेत काम करणाऱ्याला नेहमीच संधी दिली जाते. त्यामुळे मी शिवसेनेत कार्यरत राहणार आहे.
अधिक वाचा : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष
दरम्यान, यशवर्धन यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिक बळ मिळणार आहे.