Tarun Bharat

यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांची उपस्थिती ः विरोधकांनी दाखवली एकजूट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सोमवारी संसद भवनात निवडणूक अधिकाऱयांकडे अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची असून सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा विरोधात हे एक पाऊल असल्याचे ते म्हणाले. सिन्हा यांची रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याशी लढत होणार आहे. मुर्मू यांनी गेल्या आठवडय़ातच उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराला प्रारंभ करत आघाडी घेतली आहे.

नामनिर्देशन कार्यक्रमादरम्यान विरोधकांनी एकजूट दाखवत शक्तिप्रदर्शन केले. नामांकनावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. याप्रसंगी खरी लढाई ही दोन विचारधारांमध्ये असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 24 जून रोजी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनाच्या वेळी सत्ताधारी पक्षाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला होता.

17 विरोधी पक्ष पाठीशी असल्याचा दावा

यशवंत सिन्हा यांना 17 विरोधी पक्षांसह तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनीही पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. तसेच आपल्याला आणखी अदृश्य शक्तींचा पाठिंबा असेल, असा विश्वास सिन्हा यांना आहे. तथापि, भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी आपले वडील यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवलेला नाही. यासंबंधी बोलताना ‘मी कोणत्याही धर्म संकटात नाहीय. माझा मुलगा राजधर्म पाळेल आणि मी माझा राष्ट्रधर्म पाळेन’, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रपती भवनात आणखी एक ‘रबर स्टॅम्प’ आल्यास अनर्थ होईल. मी निवडणुकीत जिंकलो तर शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, महिला आणि उपेक्षित समाजातील सर्व घटकांचा आवाज बुलंद करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

18 रोजी मतदान, 21 जुलै रोजी मतमोजणी

राष्ट्रपतीपदासाठी मतदान 18 जुलैला, तर मतमोजणी 21 जुलैला होणार आहे. राजकीय समीकरणाबद्दल बोलायचे तर विरोधी पक्षांची युती असलेल्या संपुआकडे संख्याबळ कमी आहे. रालोआकडे एकूण 5.26 लाख मते आहेत, जी एकूण मतांच्या सुमारे 49 टक्के आहेत. आणखी फक्त एक टक्का आवश्यक आहे. वायएसआर काँग्रेस पक्ष किंवा बिजू जनता दलाच्या पाठिंब्याने हे साध्य होऊ शकते. बसपनेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने त्यांना ‘हत्ती’चे बळ आले आहे.

Related Stories

पत्नी न परतल्याने पतीचा ‘प्रताप’

Patil_p

कंगना ,अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग

Patil_p

मानव विकास निर्देशांकात भारत 131 व्या स्थानावर

Patil_p

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीने हाहाकार

Patil_p

वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस

Patil_p

ओमिक्रॉनचे निदान करणाऱ्या ‘ओमिशुअर’ला मंजुरी

datta jadhav