मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ, वाजंत्री गल्ली येथील करेव्वा देवी यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. भंडाऱयाची उधळण आणि जयजयकार करत दोन दिवसांच्या यात्रेची सांगता करण्यात आली. मंगळवार दि. 14 रोजी सकाळी भांदुर गल्ली, अनगोळ येथील रेणूकादेवी मंदिर येथून रेणूका देवीचा जग वाजत-गाजत, भंडाऱयाची उधळण करत करेव्वा देवी मंदिरमध्ये आणण्यात आला.
त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. गल्लीतील महिला, भक्त तसेच पंच कमिटीने दिवसभर पडल्या भरल्या. गावातील नागरिकांनी करेव्वा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी सांगली येथील लक्ष्मी ब्रॉस बॅन्ड कंपनी (हरिपूर) व न्यू दरबार ब्रॉस बॅन्ड कंपनी (शिरीशिन्नोळी, कराड-सातारा) यांच्यात जुगलबंदी आयोजित करण्यात आली होती. एकापेक्षा एक सुमधूर गीतांची पेशकश करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढून यात्रेची सांगता झाली. या मिरवणुकीमध्ये तरुण, महिलांनी मोठा सहभाग दर्शविला होता.