आंबिल गाडय़ांची मिरवणूक ; उद्या इंगळय़ा, गुरुवारी कुस्त्यांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार दि. 25 पासून प्रारंभ होत आहे. सोमवारी सायंकाळी आंबिल गाडय़ाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावकऱयांनी याची जोरदार तयारी केली आहे.
मंगळवारी श्री चांगळेश्वरी, कलमेश्वर मंदिरांसमोर इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी बैलजोडय़ांची मिरवणूक (मजल) काढण्यात येणार आहे. त्यासाठी बहुसंख्य मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांगळेश्वरी मंदिर तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे चांगळेश्वरी देवीची यात्रा साध्या पद्धतीने करण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे ही यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे यावर्षी ही यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी होणार आहे. बुधवार दि. 27 रोजी महालक्ष्मीचा वाढदिवस होणार आहे.
गुरुवारी जंगी कुस्त्या
येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे मैदान म्हणून ओळखले जाते. यावर्षी राष्ट्रीय स्तरावरील पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. महाराष्ट्र मैदानाच्या कमिटीने गेल्या महिन्याभरापासून त्याची तयारी सुरू केली आहे. अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार असल्याने कुस्ती शौकीनदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या या आखाडय़ाची बांधणी करण्यात आली असून कमिटीचे सदस्य कामामध्ये गुंतले आहेत.