बैलजोडय़ा सजवून आंबिल गाडय़ांची भव्य मिरवणूक : आज होणार इंगळय़ांचा कार्यक्रम
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. मोठय़ा उत्साहाने या यात्रेची तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी 7 नंतर आंबिल गाडय़ांना प्रारंभ झाला. शेतकऱयांनी बैलजोडय़ा सजवून या मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
श्री चांगळेश्वरी मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. या यात्रोत्सवानिमित्त विविध प्रकारची खेळणी विक्री करणारे विपेते तसेच इतर साहित्यासह व्यावसायिक दाखल होऊन त्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आंबिल गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मजल तसेच बॅन्ड वाद्यांचा गजर सुरू होता. अनेक तरुण तसेच शेतकरी या मजल व बॅन्डच्या तालावर नाचताना दिसत होते.
गुलालाची उधळण करत तब्बल दोन वर्षांनंतर यात्रेची मौज करताना सर्वजण दिसत होते. कोरोनामुळे दोन वर्षे अत्यंत साध्या पद्धतीने ही यात्रा साजरी करण्यात आली होती. मात्र आता कोरोना कमी झाल्यामुळे मोठय़ा उत्साहाने ही यात्रा करण्यात येत आहे.
चांगळेश्वरी मंदिरासमोर इंगळय़ांचा कार्यक्रम
ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिर तसेच कलमेश्वर मंदिरासमोर इंगळय़ांचा कार्यक्रम होत असतो. पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम केला जातो. चांगळेश्वरी मंदिरासमोर इंगळय़ांमधून अनेक भाविक मोठय़ा भक्तीने पळत असतात. त्यामध्ये महिलांचाही समावेश असतो. मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी भाविक दिवसभर उपवास करतात. त्यानंतर सायंकाळी इंगळय़ांचा कार्यक्रम करून ते उपवास सोडतात.
मंदिराचे पुजारी मंदिरातील पूजेबरोबरच मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्या इंगळय़ांजवळ पूजा-अर्चा करतात. त्यानंतर पालखीसह भाविक यामधून धावतात. मोठय़ा भक्तिभावाने आणि उत्साहाने भक्त यामध्ये सामील होतात. महिलावर्ग मोठय़ा प्रमाणात यामध्ये सहभागी असतो. माहेरवाशिणी यात्रेसाठी येतात. त्यादेखील उपवास करून या इंगळय़ांमधून धावून आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.