466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी राणा कपूर यांना दिल्लीतील एका मालमत्तेच्या विक्रीसंबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाला होता. आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झाल्यामुळे तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटपामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल करत व्यवहार पूर्ववत केले होते.
राणा कपूर यांना ईडीने 466.51 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली होती. त्यांनंतर त्यांच्या पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. याचदरम्यान सीबीआयने राणा कपूर आणि अवंता ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांच्यावर 466.51 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. राणा कपूर हे येस बँकेचे सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे.