नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतासह संपूर्ण जगभरात मंगळवार, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. यंदाचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यंदाची संकल्पना ‘मानवतेसाठी योग’ अशी निश्चित करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने या संकल्पनेची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात यावषीच्या संकल्पनेची घोषणा केली होती. योगदिनाची ही संकल्पना खूप विचारविनिमय आणि सल्लामसलत केल्यानंतर निवडण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकात म्हैसूर येथे आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी म्हैसूर येथील कार्यक्रमात सहभागी होणार असून ‘चला योग दिन यशस्वीपणे साजरा करत, त्याचा अधिकाधिक प्रसार करूया’, असे ट्विट त्यांनी केले आहे. भारत यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असल्याने मंगळवारी राष्ट्रीय स्तरावरील 75 महत्वाच्या स्थळांवर मोठय़ा प्रमाणात सामाईक योग प्रोटोकॉल अंतर्गत प्रात्यक्षिकेही दाखवली जातील. त्याच धर्तीवर विविध राज्यांनी निवडलेल्या आपल्या राज्यातील 75 महत्वाच्या स्थळांवर देखील असेच कार्यक्रम आणि योग प्रात्यक्षिके सादर केली जातील. शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, पर्यटनस्थळे अशा बऱयाचठिकाणी योगसाधनेचा आविष्कार दिसून येणार आहे.