दुसऱया कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या दुसऱया कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी 6.15 लाख कोटी रुपयांचे बजेट सादर केले. राज्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी 2021-22 चे बजेट 5.50 लाख कोटी रुपये होते. यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 77 लाख 60 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरणांतर्गत पुढील पाच वर्षांत 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे 4 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत 800 व्यवसाय केंदे सुरू होणार आहेत. या तरतुदींतर्गत 16,000 नोकऱया देण्याचे लक्ष्य आहे. युवा वर्गाबरोबरच महिला, शेतकरी वर्गासाठीही अर्थसंकल्पात अधिक निधी खर्च करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी अर्थसंकल्प 90 मिनिटांत वाचून पूर्ण केला. यादरम्यान त्यांनी 3 वेळा शेरो-शायरीही वाचली. अर्थसंकल्प पेपरलेस असल्यामुळे अर्थमंत्र्यांनी लॅपटॉपवर वाचला.