1 तास विजेशिवाय राहिल्यास रोख इनाम
माणसाने स्वतःच्या सुविधेसाठी अनेक गोष्टी निर्माण केल्या, परंतु या सुविधांपोटी पृथ्वीवरील संपदा ओरबाडून घेण्याचा प्रकार वाढला आहे. यातून जगभरात ऊर्जासंकट निर्माण झाले असले तरीही लोक त्यांचा वापर कमी करण्यास तयार नाहीत. विजेचे महत्त्व समजविण्यासाठी आणि किफायतरशीपणे वापर करणे शिकविण्यासाठी ब्रिटनमध्ये नॅशनल ग्रीडकडून एक अनोखी ऑफर दिली जात आहे.
तेथील ग्राहकांना तासभर अंधारात बसून रहावे लागते, याकरता त्यांना हजारो रुपये इनाम म्हणून दिले जाणार आहेत. ही ऑफ लोकांना डिमांड फ्लेक्सिबिलिटी सर्व्हिस इव्हेंटच्या अंतर्गत दिली जात आहे. नॅशनल ग्रीडकडून एका लाइव्ह इव्हेंटचे आयोजन केले जात आहे. डिमांड फ्लेक्सिबिलटी सर्व्हिस (डीएफएस) नावाच्या या इव्हेंटमध्ये लोकांसाठी योजना सादर करण्यात आली आहे.
या योजनेनुसार लोकांना संध्याकाळी एक तास विजेशिवाय बसून रहावे लागणार आहे, याच्या बदल्यात ग्राहकाला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. या इव्हेंटमध्ये डीएफएस स्कीमसाठी साइन अप करावे लागणार आहे, अशाप्रकारे वीज बचत करण्यास मदत हेण्यासह लोकांना योग्य तो संदेशही मिळणार आहे.
वीज वाचविण्याची मोहीम
उन्हाळा असो किंवा हिवाळा जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये विजेचा वापर वाढताहे. कधी स्वतःला थंड तर कधी उबदार ठेवण्यासाठी लोक विजेच्या उपकरणांचा वापर करतात. संध्याकाळी विजेच्या वापराचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांना विजेचा वापर कमी किंवा वापर न केल्यास किती पैसे वाचविले जाऊ शकतात हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.