ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी पैशांची सुरक्षितता आणि परतावा पाहता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. केंद्र सरकारच्या या सुरक्षित गुंतवणुकीतून तुम्हीही करोडपती बनू शकता.
काय आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना?
दीर्घ कालावधी, करमुक्त परतावा, वार्षिक चक्रवाढ व्याज आणि भांडवल संरक्षण म्हणून ही योजना ओळखली जाते. वित्त मंत्रालयाने 1968 मध्ये ही योजना सुरू केली असून, या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. तो मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांनी वाढवता येतो. या योजनेत दरवर्षी एकाच हप्त्यात किंवा वर्षभरात जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतात. दरवर्षी किमान 500 आणि कमाल 1,50,000 रुपये गुंतवता येतात. जमा निधीवर 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज दिले जाते.
कुठे उघडता येईल खाते?
राष्ट्रीयकृत आणि निवडक खासगी बँका, पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते उघडता येते. तसेच एखादी व्यक्ती ऑनलाईन पीपीएफ खातेही उघडू शकते.
कसे होऊ शकता करोडपती?
पगारदार लोकांसाठी भविष्यातील निधी उभारण्यासाठी PPF एक चांगला मार्ग मानला जातो. PPF खात्यावर 7.1 टक्के दराने दरवर्षी चक्रवाढ व्याज दिले जाते. त्यामुळे 25 वर्षातही या योजनेतून करोडपती होता येते. जर तुम्ही पीपीएफ खात्यात दररोज 250 रुपये जमा केले तर ही रक्कम एका महिन्यात 7500 रुपये होते. अशा प्रकारे एका वर्षात ही रक्कम 90,000 रुपयांपर्यंत पोहोचते. जर 25 वर्षांसाठी ही गुंतवणूक केली तर या कालावधीपर्यंत तुमच्याकडे 22.50 लाख रुपये जमा झाले असतील. यासह, 25 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 61,84,809 रुपयांची मोठी रक्कम मिळेल. 39,34,809 हे त्यावर जमा झालेले व्याज असेल.
या योजनेतून एक कोटी रुपये जमा करायचे असतील तर वार्षिक 1.5 लाख रुपये 25 वर्षांपर्यंत गुंतवावे लागतील. म्हणजेच तोपर्यंत 37,50,000 रुपये जमा होतील. वार्षिक 7.1 टक्के दराने 65,58,012 रुपये त्यावर व्याज जमा होईल. मॅच्युरिटीची एकूण रक्कम 1,03,08,012 रुपये होईल.