मण्णिकेरी येथील घटनेने खळबळ
बेळगाव : पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी मिळाली नाही, या मनस्तापातून एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मण्णिकेरी (ता. बेळगाव) येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
रामा भरमा खजगोनट्टी (वय 28, रा. वीरभद्र गल्ली, मण्णिकेरी) असे त्याचे नाव आहे. बुधवार दि. 15 जूनच्या रात्री 10 पासून तो घरात नव्हता. गुरुवारी सकाळी 6.30 वाजता रामाने गावाजवळील तलावानजीक असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रामाची आई सत्यव्वा भरमा खजगोनट्टी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सरकारी नोकरी मिळाली नाही, याचा त्याला मनस्ताप होत होता. याच मनस्तापातून रामाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.